पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पहिल्या तिमाहीतच करवसुलीचा उच्चांक

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पहिल्या तिमाहीतच करवसुलीचा उच्चांक
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाने महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच दमदार अशी कामगिरी केली आहे. विभागाने अवघ्या 90 दिवसांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांकडून तब्बल 447 कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. प्रामाणिकपणे कर भरून शहरविकासात योगदान देणार्‍या नागरिकांचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा  6 लाख 2 हजार 203 नोंदणीकृत मालमत्ता आहेत.  या मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ताधारकांना नोटिसा, नळकनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा कस्टमाईज एसएमएस  पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या अवघ्या पहिल्या तिमाहीतच 447 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
 50 टक्के नागरिकांनी भरला कर 
6 लाख 2 हजार 203 मालमत्ताधारकांपैकी 3 लाख 3 हजार 350 मालमत्ताधारकांनी म्हणजे पन्नास टक्के मालमत्ताधारकांनी तीन महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ताधारकांनी 447 कोटी 3 लाख  96 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. यामध्ये तब्बल 2 लाख 68 हजार 6 निवासी मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर 23 हजार 916 बिगर निवासी, 7 हजार 130 मिश्र, 2 हजार 246 औद्योगिक तर  2018 मोकळ्या जमीन असणार्‍या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे.
 वाकड झोन आघाडीवर 
कर संकलनासाठी शहरात 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक 39 हजार 600, सांगवीमध्ये 34 हजार 694, चिंचवडमध्ये 29 हजार 303 थेरगावमध्ये 28 हजार 368 मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 4 हजार 131 मालमत्ताधारकांनी कर भरला आहे.
एका दिवसात 30.85 कोटी जमा 
नेहमी वर्षाअखेर 31 मार्च रोजी सर्वाधिक कराचा भरणा होत असतो. यंदा मात्र 30 जूनला सर्वच कर संकलन विभागीय कार्यालयात मालमत्ताधारकांनी गर्दी कली होती. 30 जूनला यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले गेले. या एकाच दिवसात तब्बल 14 हजार 620 नागरिकांनी तब्बल 30 कोटी 85 लाख रुपयांचा भरणा केला. त्यात 21 कोटी निव्वळ ऑनलाईन भरणा आहे.
थकीत करवसुलीचे टार्गेट
तीन महिन्यांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आता आर्थिक वर्षातील 9 महिन्यांत उर्वरित 50 टक्के मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसूल आणि चालू कर 100 टक्के वसुली करणे हे करसंकलन विभागाचे उद्दिष्ट
असणार आहे.
करसंकलन विभागाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व श्रेय जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्या नागरिकांना आहे. त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. हा सर्व कररूपी पैसा शहराच्या शाश्वत विकासाचा पाया राहील, याची मी ग्वाही देतो. पिंपरी-चिंचवड  शहराच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होतील, यावर मी वैयक्तिक लक्ष देत आहे.
                                                                                                – शेखर सिंह, आयुक्त
गत वर्षीपासून आम्ही राबवत असलेल्या अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमांचे हे सांघिक यश आहे. हे करीत असताना आम्हाला काही जप्तीसारख्या अप्रिय कारवाया कराव्या लागल्या असल्या, तरी त्यामागे शहराच्या विकासाचे सूत्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 
                                                                        – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त
माहितीचे शुध्दीकरण, बिलांचे वेळेवर वाटप, यासाठी आमचा प्रकल्प सिद्धी एक मैलाचा दगड ठरला आहे. सिद्धीकडून वृद्धीकडे ही टॅगलाइन बचत गटांच्या महिलांनी अक्षरशः खरी करून दाखवली. या प्रकल्पाला आम्ही भविष्यात अजून उंचीवर नेणार आहोत.  आमच्या विभागातील सर्व कर्मचार्‍यांची सांघिक कामगिरी मोलाची ठरली. 
                                                                                 – नीलेश देशमुख, सहायक आयुक्त

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news