

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सहाव्या ग्वांगझू इंटरनॅशनल अॅवॉर्ड फॉर अर्बन इनोव्हेशन (ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार)च्या 15 अंतिम शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला आहे. ग्वांगझू अॅवॉर्डसाठी भारतीय शहरांमधून पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर ठरले आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. सन 2012 पासून शहरातील नव्या उपक्रमासाठी ग्वांगझू इंटरनॅशनल अॅवॉर्ड देण्यात येतात. ज्ञान निर्मितीला चालना देण्यासाठी आणि शहरी नावीन्यतेमध्ये शिक्षण सुलभ करण्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून ही संकल्पना उदयास आली आहे. गेल्या पाच टप्प्यांमधून जगभरात 1 हजार 300 हून अधिक उपक्रम सादर करण्यात आले आहेत. परिवर्तनशील शहरी विकास पद्धतींना यामधून प्रेरणा व प्रोत्साहन देण्यात येत आहे. या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देखील सहभाग नोंदविला होता.
भारतातून पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे. तसेच, अंतल्या (तुर्किये), बोगोटा (कोलंबिया), केप टाउन (दक्षिण आफि—का), ग्वांगजू (कोरिया), हलांद्री (ग्रीस), इज्तापालापा (मेक्सिको), जकार्ता (इंडोनेशिया), कंपाला (युगांडा), कझान (रशिया), मॅनहाइम (जर्मनी), रामल्लाह (पॅलेस्टाईन), साओ पाउलो (ब—ाझील), तेहरान (इराण) आणि झियानिंग (चीन) ही सर्व शहरे जगभरातील शहरी नवकल्पनांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
जगातील 54 देशांमधील 193 शहरे आणि प्रदेशांमधील तब्बल 274 उपक्रमांनी ग्वांगझू पुरस्काराच्या सहाव्या फेरीसाठी अर्ज सादर केले होते. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराची निवड खूप महत्त्वाची ठरली आहे. पुरस्कार प्रक्रीयेतील सादरीकरण मूल्यांकनासाठी 11 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची एक तांत्रिक समिती बोलावण्यात आली होती. समितीमार्फत शाश्वत विकास उद्दिष्टे, न्यू अर्बन अजेंडाच्या स्थानिक अंमलबजावणीच्या पाठपुराव्याशी संबंधित बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यातून निवड झालेल्या 45 पात्र उपक्रमांपैकी अंतिम 15 शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे.
'हे यश शहरासाठी गौरवास्पद'
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिळालेले हे यश शहरातील नागरिकांसाठी गौरवाची बाब आहे. शहरातील नागरिकांचा सहभाग हे नावीन्यपूर्ण शहरी उपायांबद्दलचे समर्पण प्रतिबिंबित दर्शविते. आमचे अनुभव जगासोबत मांडण्यासाठी आम्ही कटिबध्द असून, त्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. विकास व शहराची प्रगतीसाठी पालिका वचनबद्ध आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.