

पिंपरी : अल्पवयीन गुन्हेगारांना रोखणे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान असल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडचा पदभार स्वीकारून दोन महिने झाले आहेत. गुन्हेगारीचा अभ्यास केल्यानंतरच माध्यमांशी बोलणार असल्याचे त्यांनी सुरुवातीला सांगितले होते. त्यानुसार, शिंदे यांनी गुरुवारी (दि. 23) माध्यमांशी संवाद साधला. या वेळी अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, आनंद भोईटे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट, प्रशांत अमृतकर उपस्थित होते.
माध्यमांशी संवाद साधताना अंकुश शिंदे म्हणाले, की शहरातील एकूण गुन्हेगारीचा अभ्यास केला असता येथील बालगुन्हेगारी रोखणे हे महत्वाचे आव्हान वाटत आहे. त्यासाठी आम्ही झोपडपट्टी परिसरात जाऊन समुपदेशन करण्याचे काम सुरू केले आहे.
तसेच, पालकांनीदेखील मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलांकडे वेळीच लक्ष दिल्यास त्यांना आपण गुन्हेगारीपासून दूर
ठेवू शकतो.
याव्यतिरिक्त शहरातील स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू असल्याचे अंकुश शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, की चाकण आणि एमआयडीसी भोसरी परिसरात कामगारांची लूट होत आहे. त्यासाठी या भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच, सर्व परिसर सीसीटीव्हीच्या निगरानी खाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे स्ट्रीट क्राईम रोखणे शक्य होईल.