

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दुचाकी जोरात चालवत असल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर कोयत्याने वार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री सव्वा अकराच्या सुमारास भीमनगर, चिंचवड येथे घडली.
ओमकार उर्फ आनंद ओव्हाळ (24, रा. भीमनगर, चिंचवड) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत रवींद्र रामदास लोंढे (29, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री फिर्यादी आणि त्यांचा मित्र धीरज धिनेश लिंगावत (रा. मोदीखाना कॅम्प, पुणे) हे दोघेजण भीमनगर चिंचवड येथील एका बारमधून पाण्याची बाटली घेऊन घरी जात होते.
त्यावेळी आरोपी हेमंत तेथे आला. त्याने फिर्यादी यांना आवाज देऊन 'तू भीमनगरमध्ये गाडी फास्ट चालवून स्टंट मारतो का,' असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच, 'तू इथेच थांब तुला दाखवतो' असे म्हणून तिथून निघून गेला.
दरम्यान, फिर्यादी आणि त्यांचा मित्र घरी जाण्यासाठी निघाले असता आरोपीने पाठीमागून येऊन फिर्यादी यांना उलट्या कोयत्याने मारले. फिर्यादी यांचा मित्र धीरज मध्यस्थी करीत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात कोयत्याने मारून जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.