पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : नवी सांगवीतील साई चौकात असलेल्या वीजपेटीचे दार तुटले आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
एकीकडे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना उपनगरातील वीज पेट्यांची अवस्था दयनीय होत चालली आहे. नागरिकांनी अनेकवेळा तक्रार करुनही महावितरण प्रशासन याकडे दुुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील अंतर्गत रस्त्यालगतच्या लहान वीजपेट्यांचा दरवाजा तुटलेला दिसत आहे. या वीजपेट्याभोवती गवत वाढलेले दिसून येत आहे. भरवस्ती आणि मुख्य चौकात जागोजागी असणार्या वीजपेट्यांवर जाहिराती चिटविलेल्या दिसून येतात.
पिंपळे गुरव भागातील जय भीम चौक, सह्याद्री कॉलनी परिसरातील वीज पेट्यांचे झाकण निखलेली दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर वीजपेटीला झाकण लावण्याची मागणी केली आहे.