

किनवट : नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त पाचोंदा गावातील अल्प भूधारक शेतकऱ्याचा मुलगा राहुल शंकरराव महामुने यांनी जिद्द आणि कठोर परिश्रमाने उत्तूंग यश मिळवले आहे. महामुने यांनी अभ्यास करून ‘एमपीएससी’ परिक्षेत कठोर परिश्रम करुन 'क्लास वन' अधिकारी 'अ' पदाला गवसणी घातल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
अतिदुर्गम पाचोंदा येथील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य रमाबाई व शंकरराव महामुने यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचं बाळकडू पाजल्यामुळे, त्यांची तिन्ही मुलं शिक्षक झालीत. मोठा मुलगा अनिल महामुने हे शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा प्रवास करीत माजी गट शिक्षणाधिकारी आणि आता पीएम पोषण आहार शक्ती निर्माण योजनेच्या अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. कनिष्ठ चिरंजीव राहुल महामुने यांची बालपणापासून शिक्षणात गती असल्यामुळे ज्येष्ठ बंधू अनिलरावांनी त्यांना सदैव मोठे स्वप्न पाहण्यास प्रेरित केले.
त्यानुसार पाचोंदा येथे जि.प.शाळेत प्राथमिक तर महात्मा फुले जि.प.शाळेत उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण घेऊन पनवेल येथून डी.एड्.उत्तीर्ण झाल्यानंतर ते शासकीय आश्रमशाळा झराळा येथे सहशिक्षक म्हणून रुजू झाले. तेथून बदली झाल्यानंतर सारखणीच्या शासकीय आश्रमशाळेत ते विद्यार्थीप्रिय गुरूजी ठरले. विद्यादानाचे कर्तव्य पार पाडीतच त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली व पहिल्याच परिक्षेत उत्तीण होऊन नंदुरबार येथे गृहपालपदी रुजू झाले. वडील बंधूंच्या प्रोत्साहनाने त्यांनी यावर समाधान न मानता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा देण्याची जिद्द मनाशी बाळगली.
त्यातच सन 2020 मध्ये एमपीएससीची वरिष्ठ संशोधन अधिकारी/ सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी गट 'अ' या आदिवासी विकास विभागातील सरळसेवा पदभरतीसाठी जाहिरात आली होती. तो फार्म भरून रात्रंदिवस मेहनत करीत अभ्यासात चौफेर सातत्य ठेऊन त्यांनी परीक्षा दिली. त्या परिक्षेचा निकाल काल 28 नोव्हेंबर 2024 रोजी आला आणि त्यात राहुल महामुने हे महाराष्ट्रातून सर्वप्रथम आले.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पेयजलाची ही नित्य समस्या असणाऱ्या पाचोंदा गावातील अल्प भूधारक शेतकरी रमाबाई व शंकरराव महामुने या दाम्पत्यांनी लेकरांच्या शिक्षणावर आवर्जुन भर दिला. त्यांचे काका गौतमराव महामुने, रमेश महामुने, परमेश्वर महामुने व विश्वनाथ महामुने यांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले. यामुळेच ते आज यशाची पायरी चढत आहेत. हे इतर शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.