पुणे : पीएमपी मुख्यालयातील 14 कर्मचार्‍यांची उचलबांगडी

पुणे : पीएमपी मुख्यालयातील 14 कर्मचार्‍यांची उचलबांगडी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या मुख्यालयात कार्यालयीन कामाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या वाहकांची नुकतीच उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रशासनाने 14 जणांना पुन्हा मार्गावर वाहक म्हणून पाठविले आहे. आणखी बरेचसे चालक-वाहक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कुशीत (मर्जीत) राहून डेपो, दोन्ही मुख्यालयात कार्यालयीन काम करत आहेत. आता हे चालक-वाहक मार्गावर कधी निघणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एकूण 14 कर्मचार्‍यांना कार्यालयातून मार्गावर उतरविण्याचे आदेश गुरुवारी पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी काढले. पीएमपीच्या ताफ्यात वाहकांची अगोदरच कमतरता आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने नुकतेच 600 चालकांना वाहक बनविले आहे. तरीसुद्धा पीएमपी प्रशासनाला आणखी वाहकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे पीएमपीकडून वाहकांची भरती करण्याचे नियोजन आहे.

पीएमपीच्या ई-तिकीट मशिनमध्ये दिसणार कॅश
पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना तिकीट देण्यासाठी ई-तिकीट मशीन ही यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून कार्यान्वित केली आहे. याद्वारे वाहक प्रवाशांना तिकीट देतात. त्याद्वारे पीएमपी प्रशासनाला दिवसभरात किती प्रवाशांनी प्रवास केला, किती उत्पन्न मिळाले याची माहिती मिळते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या मशीनमध्ये दिवसभरात जमा होणारी कॅश वाहकांना दिसत नव्हती, त्यामुळे मोठा गोंधळ होत होता. यामुळे अनेक वाहकांना निलंबित करण्यात आले होते.

51 क्लार्क इलेक्शन ड्यूटीवर
एकीकडे पीएमपीकडे कार्यालयीन कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील वाहकांनाच कार्यालयीन कामासाठी नियुक्त केले आहे. मात्र, दुसरीकडे दयावान पीएमपीच्या अधिकार्‍यांनी प्रशासनातील 51 क्लार्कला निवडणुकीच्या कामासाठी पाठविले आहे. तसेच, कोरोनाकाळात महापालिकेला पाठविलेले 117 कर्मचारीदेखील अद्यापपर्यंत पुन्हा पीएमपीमध्ये आलेले नाहीत.

त्यामुळे कर्मचार्‍यांचे वाटप आता पीएमपीच्याच मुळावर आले आहे. इतर सरकारी विभागांना कर्मचार्‍यांचा तुटवडा भासला की, ते अनेकदा पीएमपीचे कर्मचारी कामाला बोलावून घेतात. मात्र, पीएमपीतील कामकाज एका बाजूला पडत असून, त्याचा उत्पन्नावर आणि प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. यामुळे पीएमपी कर्मचार्‍यांना योग्य त्या ठिकाणी लावून कामाच्या सुसूत्रीकरणाची सध्या मोठी गरज निर्माण झाली आहे.

कमतरतेमुळे 625 चालकांना बनविले वाहक
पीएमपी प्रशासनाला चालू वर्षात चालकांची आवश्यकता भासली. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील चालकांनाच प्रशिक्षण देऊन वाहक बनविले आहे. तब्बल 625 चालक पीएमपी प्रशासनाने वाहक केले. आणखी 500 नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्याकरिता आणखी वाहकांची पीएमपी प्रशासनाला आवश्यकता भासणार आहे.

ताफ्यातील 400 कर्मचारी वर्षाला होताहेत कमी
पीएमपीचे 2022-23 या चालू वर्षात आतापर्यंत 382 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. तर काही अपघात आणि आरोग्याच्या समस्येमुळे मयत झाले आहेत. तर अनेकांना प्रशासनाने गंभीर चुकीमुळे कायमचे बडतर्फ केले आहे. यामुळे 400 कर्मचारी पीएमपीच्या ताफ्यातून कमी झाले असून, एवढीच संख्या पीएमपीमध्ये दरवर्षाला कमी होणार्‍या कर्मचार्‍यांची असते. परिणामी, ताफ्यातील बस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरविणे प्रशासनाला अवघड झाले असून, प्रवाशांचे हाल होत आहेत.

पीएमपीच्या ताफ्यातील कर्मचारी
चालक 2 हजार 296
वाहक 4 हजार 776
प्रशासकीय कर्मचारी 600
अभियांत्रिकी (वर्कशॉप) 1 हजार 100
सुरक्षा कर्मचारी 675
एकूण कर्मचारी 9 हजार 22
ठेकेदारांचे चालक 2 हजार 500

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news