

पुणे: फार्मसी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी संबंधित फार्मसी पदविका संस्थांनी येत्या 24 सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची सर्व माहिती अद्ययावत करावी, असे स्पष्ट निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिले आहेत. त्यामुळे फार्मसी प्रवेशाचे बिगुल वाजले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. मोहितकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली या शिखर परिषदेद्वारे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांची मान्यता प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. (Latest Pune News)
त्यानुसार औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी शिखर परिषदेची मान्यता, शासन मान्यता, राज्य तंत्रशिक्षण मंडळाची संलग्नता प्रदान केल्याची माहिती अद्ययावत करून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. परंतु अद्यापही काही संस्थांची माहिती अद्ययावत करण्याचे प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे.
त्याअनुषंगाने, औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची मान्यता, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची संलग्नता प्रदान केल्याची माहिती व इतर माहिती अद्ययावत करून दि. 24 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पाध्दतीने पोर्टलवर निश्चित करावी.
कोणत्याही संस्थेची माहिती अद्ययावत करून निश्चित करायचे प्रलंबित राहिल्यास आणि त्यामुळे संस्थेचा समावेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेची राहील.
तसेच मंजूर प्रवेश क्षमतेची माहिती ही प्रवेश प्रक्रियेदरम्यान जागावाटपात दर्शविण्यात येणार असल्याने माहितीत कोणतीही चूक झाल्यास व पर्यायाने प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडचण उद्भवल्यास त्यास संबंधित संस्थचे प्राचार्य जबाबदार राहणार असल्याचे देखील डॉ. मोहितकर यांनी स्पष्टकेले आहे.