

चाकण: चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरवड्यात स्कॉर्पिओतून एमडी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ घेऊन तरुण जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. गाडीत एमडी मेफेड्रोन ड्रग्ज मिळाले.
गुन्हा दाखल होऊन तरुणाला अटक झाली. सुरुवातीलाच हा प्रकार अडकवण्यासाठी रचलेला डाव असल्याची शंका निर्माण झाली होती. चौकशीत तफावत आढळल्याने गोंधळ वाढला़. तांत्रिक विश्लेषण, कॉल रेकॉर्डची पाहणी़ केली असता पोलिसांना टीप देणाराच खरा सूत्रधार निघाल्याची बाब समोर आली. (Latest Pune News)
प्लॉटिंग विक्री व्यवसायातील वादातून तरुणाला अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यात अडकविल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला घाईने गुन्हा दाखल केलेल्या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी तिघांना अटक केली.
तब्बल 20 दिवसांनंतर खरा प्रकार उघडकीस आला. गुन्ह्यात अडकलेले तुषार कड यांचे सहकारी वाकी (ता. खेड) येथील निखिल कड, राहुल टोपे आणि टीप देणारा वसीम हनिफ शेख (रा. पुणे) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांचा मित्र हनिफ मुजावर (रा. वडगाव पीर, ता. आंबेगाव) याचा पोलिस शोध घेत आहेत.
चाकण पोलिसांना 23 एप्रिल रोजी, ग्रॅण्ड हॉटेलसमोर स्कॉर्पिओमध्ये मेफेड्रोन हा अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून तुषार मलिभाऊ कड (रा. वाकी) याला मेदनकरवाडी येथून ताब्यात घेतले. स्कॉर्पिओची तपासणी केली असता चालकाच्या सीटच्या पाठीमागील बाजूस पॉलिथिनच्या आठ छोट्या पिशव्यांत एमडी हा अंमली पदार्थ आढळला.
हवालदार सुनील शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तुषार कड याला अटक केली. चाकण पोलिसांनी तुषार कड याची सखोल चौकशी केली असता तो सांगत असलेली हकिकत तसेच गुन्ह्याची पद्धत यामध्ये तफावत दिसली. पोलिसांना सदर आरोपीला कोणी तरी जाणीवपूर्वक अंमली पदार्थाच्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात अडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसले.
चाकण पोलिसांनी तुषार कड, बातमीदार व इतर संशयितांची गोपनीय माहिती काढली. त्यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर सलग काही दिवस पाळत ठेवली. संबंधितांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले.
तुषार कड तसेच निखिल कड, राहुल टोपे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. यातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून तुषार कड याचा निखिल कड व राहुल टोपे यांच्याशी वाद झाला होता. त्याचा बदला घेण्याच्या हेतूने निखिल कड, राहुल टोपे यांनी त्यांचा मित्र हनिफ मुजावर व अंमली पदार्थाची बातमी देणारा वसिम शेख यांनी कट रचून तुषार कड याच्या स्कॉर्पिओत अंमली पदार्थ ठेवला.
त्याची पोलिसांना टीप देऊन तुषार कड याला अडकविले. तपासात ही बाब समोर आल्याने पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नाथा घार्गे, सहायक निरीक्षक प्रसन्न जर्हाड, अंमलदार सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, राजू जाधव, भैरोबा यादव यांनी केली.