

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या ढोल-ताशा पथकांच्या निनादात गणेशोत्सव सगळीकडे गाजत आहे. त्यात महिलांच्या ढोल-ताशा पथकातील वादकही मागे नाहीत. आपल्या उत्कृष्ट वादनाने महिला वादकही पुणेकरांची मने जिंकत आहेत. ढोल-ताशांच्या वादनाबरोबरच महिला-युवतींकडून सादर होणार्या झांज, लेझीम अन् मर्दानी खेळांचे सादरीकरणही लक्षवेधी ठरत आहे. 18 वर्षांची महाविद्यालयीन युवती असो वा 70 वर्षांच्या ज्येष्ठ महिला, वेळ काढून सर्व जणी पथकात आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उत्कृष्ट वादन करीत आहेत. यंदा पथकांत महिला-युवतींची संख्या लक्षणीय आहे आणि प्रत्येकीचा उत्साह वाखाणण्योजागा आहे.
गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला ढोल-ताशा पथकांसह झांज, लेझीम आणि मर्दानी खेळांच्या पथकांचा सहभाग दिसून येत आहे. उत्सवात गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीत महिला वादकांनी उत्कृष्ट वादन केलेच. पण, गेल्या पाच दिवसांपासून विविध गणेश मंडळे, सोसायट्यांच्या ठिकाणी महिला ढोल-ताशा पथकांकडून वादन होत आहे. पारंपरिक वेशभूषेत महिला वादक वादन करीत असून, त्यांच्या वादनाला पुणेकरांची दादही मिळत आहे. दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही युवतींचे पथक उत्सवात सादर करीत असून, त्यासाठी दाद मिळवत आहेत. उत्सवाच्या उर्वरित दिवसांमध्ये पथकांचा आवाज घुमणार असून, विसर्जन मिरवणुकीत शैलीदार वादन करण्यासाठी महिलांची ढोल-ताशा पथके सज्ज आहेत.
त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठानचे विनोद आढाव म्हणाले, 'आमच्या पथकात मर्दानी खेळांमध्ये युवतींचा सहभाग आहे. त्या सध्या सरावात व्यस्त आहेत. आमच्या लाकडी ढोल-ताशा पथकातही युवती आहेत. मोठ्या हिरिरीने आणि आत्मविश्वासाने त्या मर्दानी खेळ सादर करीत आहेत. दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी आदी खेळांचे सादरीकरण करून त्या उपस्थितांची मने जिंकत आहेत. विसर्जन मिरवणुकीत युवती ढोल-ताशांच्या वादनासह मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करतील.'
लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, अशा मर्दानी खेळांच्या पथकात महिला-युवतींचा सहभाग आहे. झांज आणि लेझीम पथकातही महिला-युवती आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वेशभूषेत महिला-युवती गणेशोत्सवात सादरीकरण करीत आहेत.
महिला-युवतींचेही वेगळे ढोल-ताशा पथक असावेत, या उद्देशाने आमचे पथक 2012 मध्ये सुरू झाले. आता 55 जणींचा पथकात सहभाग असून, त्या 16 ते 70 वयोगटातील आहेत. त्यांच्यात जोश आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सर्व जणी उत्कृष्ट वादन करीत आहेत. फक्त महिलांचे पथक असल्याने लोकांचा आणि मंडळांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– स्मिता इंदापूरकर, मानिनी ढोल-ताशा पथक