पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी नको ते मुद्दे भाजपाच्या नेत्यांकडून उकरुन काढले जात आहेत. राज्यापुढील खरी आव्हाने कोणती आहेत, त्याला कारणीभूत कोण आहे, त्याचा नागरिकांनी विचार करावा. भ्रष्टाचारी भाजपला जनताच खरा शॉक देणार आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार मंगळवारी (दि.21) म्हणाले. पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथे विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार यांना 440 व्होल्टचा शॉक देणार असल्याचा पुनरुच्चार केला.
त्यावर पवार म्हणाले की, त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. खरा शॉक देणारी जनता आहे. त्यामुळे अशा बाष्फळ बडबडीकडे मी फार लक्ष देत नाही. नागपूर अधिवेशनात चार ते पाच मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली होती. काही काळ माध्यमांनी ती लावून धरली. मात्र नंतर भावनिक मुद्दे बाहेर काढून जनतेचे लक्ष त्यापासून विचलीत केले. त्यानंतर त्या मंत्र्यांना अलगद क्लीन चिट देण्यात आली. ही भाजपची पध्दतच आहे, अशी टीका त्यांनी केली. देशाला व राज्याला समस्यांच्या खाईत लोटणार्या सत्ताधार्यांना जनता वैतागली आहे. त्यामुळे सत्ताधार्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली.