

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : राम राम पाव्हण, इलक्षण (जिल्हा परिषद व पंचायत समिती ) कवा होणार, ही ग्रामीण भागातील चर्चा; तर शहरात दादा नगपालिकेच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न ,निवडणुकांची वाट पाहून जाम वैतागलो राव, असे किती दिवस हे चालू राहणार, राजकारणाचा कंटाळा आला आहे असे उद्दिग्ननता राजकीय पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती असून, शिरूर शहर व तालुक्यात याहून वाईट राजकीय परिस्थिती आहे. गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांत व पदाधिकार्यांमध्ये मरगळ आली आहे. कुणीही पुढे येण्यास तयार नाही. दोन्ही निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त असून, गेलेले दीड वर्ष तसेच निवडणुका जवळ आल्या म्हणून मुदत संपण्यापूर्वीचे एक वर्ष असे अडीच वर्षे इच्छुक कामाला लागले होते.
राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीनंतर अनेक राजकीय उलथापालथींचा परिणाम 'ग्राउंड लेवल'लासुध्दा परिणाम झाल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक प्रचंड वैतागले आहेत. किती दिवस खर्च करायचा, कार्यकर्ते सांभाळायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दीड वर्षांपूर्वी असणारी इच्छुकांची संख्या प्रचंड होती. आज ती कमी होताना दिसत आहे. राज्यकर्ते आपल्या राजकारणात मश्गुल आहेत. मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी वार्यावर सोडून दिल्याची भावना कार्यकर्त्यामध्ये पसरत असून, राजकारण नको काहीतरी आपले स्व:ताचे पाहिले पाहिजे या निर्णयापर्यंत ते पोहचले आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या आपल्या लोकशाहीचा कणा आहे. रोजच्या जीवनातील अडचणींचे सर्व निर्णय येथे घेतले जातात, प्रशासकाला निर्णय घेण्याच्या मर्यादा असल्याने गेल्या दीड वर्षांपासून विकासकामे खोळंबली आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज जर या निवडणुका पार पडल्या असत्या, तर गारपिटी व अवकाळी पावसाने जे शेतकर्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले त्या वेळी या सदस्यांनी याचे पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करून शासन दरबारी मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले असते. प्रशासकांना निर्णय घेण्याबाबत मर्यादा येत असल्याने आज शेतकर्यांचे प्रचंड हाल होत आहेत.