पुणे: मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, मोटार वाहन कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. असे असतानाही तरुणाईसह काही ज्येष्ठ मंडळी आणि महिलादेखील स्कूटर चालवताना सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करत आहेत.
यात कहर म्हणजे, असे गुन्हे सर्वाधिक स्कूटर (मोपेड) चालकांकडून होत असल्याचे पाहाणीदरम्यान समोर आले आहे. त्यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता असून, प्रशासकीय यंत्रणांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करून जरब बसवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शहर आणि परिसरात सर्वाधिक अपघात दुचाकीचालकांचे आणि दुचाकीचालकांमुळेच होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दै. पुढारीच्या वतीने शहरासह परिसरातील विविध भागांत दुचाकीचालकांच्या वाहन चालवण्याच्या पध्दतींची पाहाणी करण्यात आली.
या वेळी काही दुचाकीस्वार सिग्नल तोडताना पाहायला मिळाले. तर काही मोबाईलवर बोलत दुचाकी सुसाट पळवताना पाहायला मिळाले. त्यातही महत्त्वाचे म्हणजे मोबाईल टॉकिंगचा गुन्हा सर्वाधिक स्कूटर (मोपेड) चालकांकडून होत असल्याचे समोर आले. स्कूटरचालकांनी बेशिस्तपणे गाडी चालवू नये. तसेच वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या वायुवेग पथकाने अशा बेशिस्त स्कूटरचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
तरुणाईंकडूनच सर्वाधिक नियमाचे उल्लंघन
दुचाकी महाविद्यालयीन तरुणाई, ज्येष्ठ आणि महिलाही स्कूटर चालवतात. महिला आणि ज्येष्ठ नागरिक गाडी चालवताना अनेकदा फोनवर बोलणे टाळतात. मात्र, मोबाईल टॉकिंगच्या या नियमाचे उल्लंघन सर्वाधिक महाविद्यालयीन तरुणाई आणि भाईगिरीच्या नादात गुरफटलेली तरुणाईकडून होत असल्याचे समोर आले आहे.
आरटीओकडून 1490 जणांना दणका
वाहनचालकांना शिस्त लागावी आणि अपघात कमी व्हावेत, याकरिता आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत शहरासह महामार्गावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होत असते. अशीच फोनवर बोलत दुचाकी पळवणार्या बेशिस्त वाहनचालकांवर पुणे आरटीओकडून कारवाई करण्यात आली आहे. 2024 या वर्षभराच्या कालावधीत पुणे आरटीओने तब्बल 1490 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही बेशिस्त वाहनचालक सुधारण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसत आहे.
..तर वाढीव दंडाची कारवाई
बेशिस्तपणे वाहने चालवल्यास मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांतर्गत वाहनचालकावर दंडात्मक आणि कारावासाचीदेखील शिक्षा होते. मोबाईल टॉकिंग केले, तर मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार दंडात्मक कारवाई होते. पहिल्यावेळी मोबाईलवर बोलताना सापडला तर एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच, दुसर्या आणि तिसर्या वेळी नियमभंग असेल, तर वाढीव दंडाचीदेखील कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.
मोबाईलवर बोलत दुचाकी चालवणे, हा मोटार वाहन कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. असा गुन्हा करताना आढळल्यास दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. वायुवेग पथकामार्फत सातत्याने अशी कारवाई सुरू असते. गेल्या वर्षभरात मोबाईलवर बोलत वाहने चालवणार्या 1490 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.