

पुणे: पुणे विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी येणार्या खासगी चारचाकी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता विमानतळ टर्मिनलसमोर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणार्या वाहनांवर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना वेळेत विमानतळावर पोहचता येणार असून, वाहतूक कोंडीची समस्याही सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
पुणे विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणार्या खासगी चारचाकी वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा नागरिक आपले नातेवाइक येईपर्यंत किंवा त्यांना सोडल्यानंतर तासन् तास आपली वाहने टर्मिनलसमोरच उभी करतात. (Latest Pune News)
त्यामुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून पुणे विमानतळ प्रशासनाने आता 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ विमानतळ परिसरात वाहन उभे करणार्या चालकांवर 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंमलबजावणीसाठी विशेष पथक तैनात करणार मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळ प्रशासनाने या संदर्भातील प्रस्ताव दिल्ली मुख्यालयाला पाठवलाअसून त्याला मंजुरी मिळताच याची अंमलबजावणी सुरू केली.
विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की, या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. हेपथक नियम मोडणार्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करेल.
पुणे विमानतळावर टर्मिनलसमोर होणारी वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. अनेकदा प्रवासी आणि वाहनचालक तासन् तास गाड्या टर्मिनलसमोर उभ्या करून ठेवतात. त्यामुळे इतर प्रवाशांना आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही हा कठोर निर्णय घेतला आहे. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणार्या वाहनांवर 500 रुपये दंड आकारल्याने अनावश्यक गर्दी कमी होईल आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठीच घेण्यात आला आहे.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
मी नियमितपणे पुणे विमानतळावर जात असतो. अनेकदा येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, विशेषतः पीक अवर्समध्ये. नातेवाइकांना सोडण्यासाठी येणारे लोक तासन् तास गाड्या लावून ठेवतात, त्यामुळे प्रचंड गोंधळ होतो. विमानतळ प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन सर्वांना सोयीचे होईल. मात्र, 15 मिनिटांचा कालावधी हा पुरेसा आहे का, याचाही विचार व्हायला हवा.
- नितीन इंगुळकर, वाहनचालक