पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांमध्ये जंगली महाराज रस्त्याची (जे. एम. रोड) वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचार्यांना मोठी कसरत करावी लागते. पादचार्यांच्या सोईसाठी आता पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पादचार्यांसह वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. एकेरी वाहतूक असल्यामुळे जे. एम. रोडवर वाहनांचा वेग जास्त असतो. येथून रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना रस्ता ओलांडताना जीव धोक्यात टाकावा लागतो. मात्र, आता मेट्रोने स्थानकाशी जोडलेले पादचारी पूल थेट रोडच्या पलीकडे उतरविले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आणि पादचार्यांना रस्ता ओलांडणे सोपे होणार आहे.
झाशीची राणी पुतळा चौक सोडला तर थेट रस्ता क्रॉस करण्यासाठी डेक्कन आणि डावीकडे खंडोजीबाबा चौक आणि उजवीकडे गुडलक चौकाचा सिग्नल आहे. अधे-मधे रस्ता ओलांडायचा तर पादचार्यांचे मोठे हाल होतात. हे लक्षात घेत मेट्रोने संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला जोडलेला आणि डेक्कन मेट्रो स्थानकाला जोडलेला पादचारी पूल थेट रस्त्याच्या पलीकडे उतरविला आहे. त्यामुळे मेट्रो प्रवासी आणि पादचार्यांना दिलासा मिळाला आहे.
पादचारी पूल उभारल्यामुळे मेट्रो प्रवाशांना जंगली महाराज रस्ता ओलांडून सहजतेने मेट्रो स्थानकात प्रवेश करणे सोपे होणार आहे. येथून ये-जा करणार्या पादचार्यांनादेखील याचा फायदा होईल. आगामी काळात लवकरच तो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
– हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, महामेट्रो
हेही वाचा