

सांगवी : माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यात उच्चांकी दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. सहकार क्षेत्रात या कारखान्याचा नावलौकिक आहे. सध्या माळेगाव कारखान्याच्या आजुबाजुला पवार घराण्यातील खासगी कारखाने आहेत. त्यांची गाळप क्षमता सहकारी साखर कारखान्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. स्वतःचे कारखाने चालण्यासाठी सहकार मोडीत काढण्याचा डाव ते टाकत आहेत. शेजारच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात अजित पवार यांचे घरदार संचालक मंडळात असताना त्या कारखान्याचे सध्या मोठे वाटोळे केले असल्याची टीका माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी केली.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे या गुरु शिष्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी (ता. बारामती) येथे सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर ही बोचरी टीका केली.
गेल्या पाच वर्षांपासून निरा नदीच्या प्रदूषित पाण्याचा जोपर्यंत विषय मिटत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे मते मागायला येणार नाही अशा वल्गना अजित पवार यांनी केल्या होत्या. अद्यापही प्रदुषित पाण्याचा प्रश्न मिटला नसताना स्वतःच संचालक मंडळात येण्याचा निर्णय घेतला आहे. हे कितपत बरोबर आहे असा सवाल करत चंद्रराव तावरे म्हणाले, माझ्या वयावर ते बोलतात. वय झालं म्हणून काय खायला लागत नाही का असेही ते म्हणाले.
अजित पवार यांचे आजुबाजूला खासगी कारखाने आहेत. त्यांची गाळप क्षमता सुद्धा मोठी आहे. सध्या सर्वत्र ऊस पळविण्याची स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी सहकारी साखर कारखाने कर्जबाजारी करायचे आणि मोडीत काढण्याचा डाव असल्याचे सांगून चंद्रराव तावरे म्हणाले, यांची तडफड फक्त माळेगावच्या सत्तेत येण्यासाठी चाललेली आहे. त्यांना सभासदांच्या प्रपंचाचे काही सोयरसुतक नाही. परंतु माळेगाव कारखान्याचे सभासद जागृत आहेत. ते कधीही चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील वेळी सत्तेचा वापर करून ४ हजार ६०० मतपत्रिका मतमोजणीवेळी बाद करून कारखान्याची सत्ता त्यांनी हस्तगत केली असल्याचे सांगून चंद्रराव तावरे म्हणाले, या संचालक मंडळाने चुकीचा कारभार करीत कारखाना कर्जबाजारी करून ठेवला आहे.
सत्तेचा वापर करून माळेगाव कारखान्याची निवडणूक चार महिने लांबणीवर टाकली असल्याचे सांगून रंजनकुमार तावरे म्हणाले, मागच्या निवडणुकीत खा. शरद पवार यांना सन्मानाने माळेगाव कारखान्यावर आणण्यासाठी सत्ता द्या. मात्र सत्ता येऊन पाच वर्षे संपली तरी किती वेळा शरद पवारांना कारखान्यावर आणले हे जागृत सभासदांना चांगले माहीत आहे. त्यांच्या संचालक मंडळाने चुकीचा कारभार केला म्हणून स्वतःला संचालक मंडळात यावं लागतंय ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल असेही रंजनकुमार तावरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी रंजनकुमार तावरे, ॲड. जी. बी. गावडे, युवराज तावरे-पाटील, राजेश देवकाते, ॲड. शामराव कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन उत्तम तावरे यांनी केले. ॲड. रोहन कोकरे यांनी आभार मानले.