

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत विरोधक कारण नसताना दिशाभूल करत आहेत. त्यांच्याकडून केले जाणारे आरोप धादांत खोटे आहेत. मला घटनेने निवडणूक लढवायचा अधिकार दिला आहे, त्यात त्यांच्या पोटात दुखायचे काय कारण ? मला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असला तरी अशी किती तरी येवून गेली, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावमधील प्रमुख विरोधक गुरु-शिष्यावर टीकेची झोड उठवली. तुमचं एवढं वय झालं तरी तुम्हाला कशाला निवडणूक पाहिजे, या शब्दात त्यांनी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता टोला लगावला. (Pune News Update)
बारामतीत पवार हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, माझ्यावर निवडणूक लवकर न लावण्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक कोर्टबाजीमुळे छत्रपतीची निवडणूक दहा वर्षाने झाली. छत्रपती व माळेगावचे काही कार्यक्षेत्र एकच आहे, त्यामुळे छत्रपतीची मतमोजणी झाल्यावर माळेगावची निवडणूक लागावी एवढीच माझी अपेक्षा होती. त्यात मी लोकशाही मानत नाही असे म्हणायचे कारण नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन वर्षे लांबल्या आहेत, मग तुम्ही कोणाला दोष देणार ? असा सवाल पवार यांनी केला.
आम्ही निलकंठेश्वर पॅनेलच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जाणारच आहे. ब वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे असेन असा विश्वास व्यक्त करत पवार म्हणाले, माळेगावचे खासगीकरण केले जाईल असा आरोप चुकीचा आहे. वास्तविक विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना खासगी कारखाने काढण्याचा निर्णय झाला. राज्यात अनेक नेते, मंत्री कारखान्याचे प्रतिनिधित्व करतात, मी संचालक असलो तर बिघडले कुठे असा सवाल त्यांनी केला.
माळेगावने एफआरपीपेक्षा अधिक दर दिला. आता २०० रुपयांनी कांडीबिल देत आहोत. ३३३२ रुपये एवढा दर दुसऱया कोणत्याही कारखान्याने दिलेला नाही. विरोधक कारण नसताना शेतकऱयांची दिशाभूल करत आहेत. राज्याचा मी अर्थमंत्री, मी आर्थिक शिस्तीचा भोक्ता आहे, असे पवार म्हणाले.
मागील काळात विरोधकांनी ३४०० रुपये दर दिला. त्यात २०० रुपये ठेव कापून घेतली. आम्ही नंतर ती भर भरून काढली. ही ठेव सुद्धा कारखान्यात नव्हती. ती रेकाॅर्डवर दाखवली होती. आता पत्रक काढून काहीही आरोप सुरु आहेत. त्याला उत्तर दिले जाईल. त्यांच्या काळात १०.६१ साखर उतारा होता. प्रचंड गळती होती. ज्युस गटारातून वाहत होता.आम्ही व्हीएसआयची टीम पाठवून लिकेजेस बंद केली. साखर उतारा ११.७५ वर नेला. इतिहासात १५ लाखाच्या वर गाळप नेत १२.३९ चा उतारा मिळवला. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सुद्धा कमी उताऱयात चांगले दर देणारे कारखाने म्हणून माळेगाव, सोमेश्वरचे उदाहरण देतात.
मला फक्त माळेगावची निवडणूक लढवायची नाही. मी मतदारांना फसवणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे माझ्या पॅनेलला सभासद साथ देतील.
प्रपंचाचा प्रश्न म्हणून विरोधक सांगत आहेत. आम्ही प्रपंच करत नाही का असा सवाल पवार यांनी केला. खासगीकरण कोण करेल. सहकार, अर्थ, कृषी खाते राष्ट्रवादीकडेच आहे, असेही ते म्हणाले.
कारखान्यावर ४२५ कोटींचे कर्ज असल्याचा आरोप खोटा आहे. कारखान्यावर २२९ कोटींचे कर्ज आहे तर २६९ कोटींची साखर उपलब्ध आहे. पतसंस्थेकडून एक रुपया घेतलेला नाही. एेच्छिक ठेव घेतली तर त्यात बिघडले काय, त्यातून कारखान्याचीच बचत झाली असे पवार म्हणाले. कारखान्यात काही छोट्या गोष्टी चुकीच्या घडल्या, त्या घडू नयेत यासाठी मी संचालक मंडळात असणार आहे. मला काटकसरीने कारभार करायचा आहे.
खऱाब पाण्याचा मुद्दा ते उकरून काढत आहेत. पण मी राज्य शासनाकडून ३कोटी रुपये खर्चाचे दोन एसटीपी प्लान्ट उभे केले आहेत, त्यात सभासदांना तोशिश लागलेली नाही. हे पैसे विरोधक आणू शकले असते का असा सवाल त्यांनी केला. मी राज्य शासनात पदावर आहे, त्या माध्यमातून मी सीएसआर मिळवू शकतो. व्यापाऱयांना चांगल्या दराने साखर खरेदी करा म्हणू शकतो, विरोधक हे करू शकतात का असा सवाल त्यांनी केला.
राज्यात अनेक नेत्यांचे खासगी कारखाने आहेत. ठराविक नेत्यांनी ५० टक्के सहकार संपवला असा अपप्रचार ते करत आहेत. बारामतीत खासगी कारखाना होवू दिला नाही. खासगी कारखाने काढले तरी त्याचा सहकारी कारखान्याचा दरावर परिणाम होवू दिला नाही. २६ टक्के गाळप पवारांचे खासगी कारखाने करतात हे ते म्हणतात. एखाद्याने स्वकर्तृत्वाने कारखाना उभा केला, शेतकऱयांना विश्वास दिला तर त्यांना वाईट का वाटतेय. शेतकरी बळजबरीने तर ऊस घालत नाहीत ना, स्वखूशीनेच घालतात. खासगीचा विषय माळेगावच्या निवडणूकीत कशाला, वजनाबाबत आक्षेप असेल तर अॅक्शन घ्या, कोण नाही म्हणतेय या शब्दात पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
माळेगावसारख्या छोट्या कारखान्याच्या निवडणूकीत राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष घालतात असा विरोधकांचा आरोप आहे. कारखाना छोटा आहे तर मग तुम्ही तरी का लक्ष घालता असा सवाल पवार यांनी केला. १९ हजार सभासदांचा प्रपंच कारखान्यावर अवलंबून आहे. मी बोर्डात असलो तर कामे झटपट होतील. निवडणूकीत छोटा-मोठा असे काही नसते, असे पवार म्हणाले. माळेगावबाबत विरोधकांकडून कसलाही प्रस्ताव आलेला नव्हता. मी सकारात्मकच आहे. त्यामुळे ते लोकसभा-विधानसभेला आम्ही महायुतीचा धर्म पाळला वगैरे जे म्हणत आहेत, त्यात काही अर्थ नाही. छत्रपतीत मी पुढाकार घेतलाच ना, असे पवार म्हणाले.
आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. सगळ्यांना संधी देवू शकत नाही. त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल अशी ग्वाही पवार यांनी दिली.
सरकारी यंत्रणा मी वापरत असल्याचा त्यांचा आरोप आहे, इथे सरकारी यंत्रणा वापरल्याचे दिसतेय का. वापरली असेल तर दाखवा असे आव्हान पवार यांनी दिले.