

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात महापालिकेकडून ईलेक्ट्रीक बाईक योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी 1 किलोमिटरला केवळ 1 रुपया 60 पैशामध्ये नागरिकांना वापर करता येणार आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावास सोमवारी मंजुरी देण्यात आली. शहरात ई – बाईक ई – बाईक धोरण राबविण्यास आणि त्यासाठी 500 ठिकाणी पार्कींग व चार्जिंग स्टेशन करण्यास स्थायी आणि मुख्यसभेने मान्यता दिली होती.
मात्र, यासंबंधीचा प्रस्ताव खुल्या निवीदा काढून आलेला नव्हता, त्यामुळे महापालिका प्रशासकांनी आपल्या अधिकारामध्ये खुल्या पद्धतीने निवीदा प्रक्रीया राबवून निविदा मागविल्या होत्या. यामध्ये पूर्वी ज्या कंपनीचा प्रस्ताव होता, तीच कंपनी या प्रक्रीयेत पात्र ठरली. यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आल्यानंतर त्याला सोमवारी मंजुरी देण्यात आली.
पूर्वीच्या प्रस्तावामध्ये शहरात 500 ठिकाणी पार्कींग आणि चार्जिंग स्टेशन करण्याचा समावेश होता. या प्रस्तावात मात्र शहरामध्ये ई बाईक शेअरींग योजनेअंतर्गत 250 ठिकाणी पार्तिंग व चार्जिंग स्टेशन करण्यास मंजुरी देण्यात आली. याठिकाणी नागरिकांना बाईक घेता येईल. त्याचबरोबर घरी जाताना वाहनतळावर बाईक सोडता येईल. रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा ही बाईक फायदेशिर असणार आहे.
त्यामुळे पुणेकरांना ई बाईक वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. यामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. अवजड उद्योग खात्याकडुन नॅशनल इलेक्ट्रीक मोबिलिटी मिशन प्लॅन 2020 योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेकडून राबवण्यात येणारा हा प्रकल्प संपुर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. महापालिका प्रशासन योजनेसाठी जागा देणार आहे. चार्जिंग स्टेशन उभारणे आणि बाईकचा संपुर्ण खर्च ठेकेदाराकडुण करण्यात येणार आहे. ई- बाईक वापरासाठी अॅप तयार करणे, मनुष्यबळ पुरवणे, नागरिकांना वेळेवर सुविधा देण्याची जबाबदारी ठेकेदारावर असणार आहे.
पाच वर्षांनंतर आढावा
महापालिका प्रशासन 250 ठिकाणी वाहनतळ निश्चित करेल. शहराच्या विविध भागामध्ये ही वाहनतळ असणार आहेत. त्यामुळे एका भागातून बाईक घेवून दुसर्या भागात गेल्यानंतर त्याचठिकाणी बाईक सोडता येणार आहे. महापालिकेने 30 वर्षांसाठी या योजनेला मंजुरी दिली आहे. पाच वर्षानंतर योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे.