पौड नवीन तहसीलदार कार्यालयाच्या श्रेयावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

c
c
Published on
Updated on

पौड; पुढारी वृत्तसेवा: मुळशी तहसीलदार कार्यालयाच्या पौड येथे 14 कोटी 99 लाख रुपये खर्च करून होत असलेल्या इमारतीचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पार पडले. मंजूर निधीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवाद रंगल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून पौड येथील तहसीलदार कार्यालयाची इमारत प्रशस्त व अद्ययावत व्हावी म्हणून अनेक जणांनी मागणी केली होती. मात्र, यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती.

काही दिवसांपूर्वी निधीची तरतूदही झाली होती. मात्र, सत्ताबदल आणि विविध कारणांमुळे भूमिपूजन होत नव्हते. सध्याच्या तहसीलदार कार्यालयामागे बांधकाम करायचे होते. तहसीलदार अभय चव्हाण यांनी येथे साफसफाई करून घेतली होती. शुक्रवारी पौड येथे झालेल्या समन्वयक बैठकीनंतर आमदार संग्राम थोपटे यांनी नारळ फोडत या नवीन होणार्‍या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले.

प्रसंगी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नकुल रणसिंग, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, मुळशी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, संतोष साखरे, शिवाजीराव जांभळकर, शिवाजीराव बुचडे, दादाराम मांडेकर, दिग्विजय हुलावळे, संदीप हुलावळे, गोपाळ कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गुपचूप भूमिपूजन : कोंढरे
आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तालुक्यात गुपचूप येऊन भूमिपूजन केले. माजी उपमुख्यमंत्री व तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीवरून हा निधी मंजूर केला. तसेच, मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम थोपटे यांचे काम केल्याने त्यांचा विधानसभेत विजय झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिली.

…तर सुळेंचाही पराभव : मातेरे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण असताना आमदार संग्राम थोपटे यांनी या कामासाठी निधीची मान्यता मिळवली. याबाबत कोणीही फुकटचे श्रेय घेऊ नये. आघाडीचा धर्म आम्ही लोकसभेला पाळला नसता तर खासदार सुप्रिया सुळे यांचाही पराभव झाला असता. सोशल मीडियावर व्यक्त होताना सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news