Pimpri News : व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण 45 टक्क्यांनी वाढले

Pimpri News : व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण 45 टक्क्यांनी वाढले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा सध्या ऑक्टोबर हीटमुळे दुपारी उन्हाचा तडाका वाढला आहे. तर, रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांमध्ये व्हायरल इन्फेक्शन होणार्या रुग्णांचे प्रमाण 40 ते 45 टक्क्याने वाढले आहे. सर्दी, खोकला, घशात खवखव, नाकातून रक्तस्त्राव येणे, अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. ऑक्टोबरमध्ये सामान्यतः उष्णता प्रचंड वाढते. हवेमध्ये रात्री अचानक गारवा जाणवतो. दिवसभर उकडत असते, या वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

रुग्णांच्या प्रमाणात वाढ

दुपारी पडणारे ऊन आणि रात्री जाणवणारी थंडी अशा वातावरणातील बदलाचा फटका नागरिकांना बसत आहे. विशेषतः त्याचा परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठांवर जास्त होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्यात खासगी रुग्णालय, दवाखान्यात दररोज तपासणीसाठी येणारे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण 5 ते 10 होते. त्याचे प्रमाण आता 15 ते 20 रुग्ण संख्येपर्यंत जाऊन पोहचले आहे.

आहारात बदल करा

तेलकट, तुपकट, मसालेदार खापदार्थ खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास वरचेवर होऊ लागतो. या दिवसांमध्ये आहारामध्ये ठरवून काही बदल करायला हवे. तेलकट, जास्त मसालेदार, जास्त तिखट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवा

ऑक्टोबर हीटमुळे रक्तदाब, मधुमेह यांच्या तक्रारी वाढतात. उष्मा वाढल्यानंतर हे त्रास जर अधिक जाणवत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

काय काळजी घ्याल

  • शीतपेयांचा (कोल्ड्रिंक्स) वापर टाळून त्याऐवजी लिंबू सरबत, ताक, नारळपाणी, कोकम सरबत आदी घ्यावे.
  • उन्हात जाताना डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गॉगल वापरावे.
  • शक्यतो उन्हात फिरणे टाळावे.
  • शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यावे.

ऑक्टोबर हीटमुळे सध्या दुपारी ऊन तर, रात्री थंडी असे चित्र पाहण्यास मिळत आहे. वातावरणातील या बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण 40 ते 45 टक्क्याने वाढले आहे. उन्हापासून बचाव करण्याबरोबरच आहारातही जास्त मसालेदार, तिखट आणि तळलेले पदार्थ टाळायला हवे.

– डॉ. अविनाश वाचासुंदर,
कान-नाक-घसा तज्ज्ञ

ऑक्टोबर हीटमुळे शरीरात डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवे. शीत पदार्थ खावे. वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचे आणि अ‍ॅलर्जीचे आजार होत आहेत. त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. दही, ताक, सरबत, नारळपाणी घ्यावे. तसेच फळांचे सेवन करायला हवे.

– डॉ. सायली तुळपुळे,
एमडी, मेडीसीन.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news