

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून बिदरसाठी निघालेली बिदर एक्स्प्रेस पुणे स्थानकावर फुल्ल भरून आली. गाडी फुल्ल असल्यामुळे पुणे स्थानकावर आल्यावर या गाडीचे दरवाजे उघडण्यात आले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या लातूरच्या प्रवाशांनी शनिवारी (दि.18) रात्री रेल्वे रुळावर उतरून ही गाडी तब्बल 1 तास रोखली. यामुळे रेल्वेच्या अधिकार्यांची धावपळ उडाली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी गावी जाणार्या नागरिकांची रेल्वेसह एसटी गाड्यांनादेखील शनिवारी तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे मुंबईहून निघतानाचा बिदर एक्सप्रेस 'फुल्ल' होती. ही गाडी पिंपरी-चिंचवड स्थानकावर आली, त्या वेळी येथे असलेल्या लातूरच्या प्रवाशांना या गाडीत जागा मिळाली नाही. तेथून पुढेही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर आली.
त्या वेळी बिदर एक्स्प्रेसच्या आतील प्रवाशांनी डब्यांचे दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर अगोदरच गाडीच्या प्रतिक्षेत असलेले प्रवासी संतापले आणि त्यांनी थेट रेल्वे रुळ गाठत जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली. त्यांनी रेल्वेच्या इंजिनसमोर झोपून, उभे राहून या वेळी आंदोलन केले. तर ही गाडी विलासराव देशमुख यांनी सुरू केली आहे आणि लातूरकरांना या गाडीत जागा नाही.
जोपर्यंत आम्हाला जागा मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे म्हणत महिला प्रवाशांनी आंदोलन केले. अचानक उडालेल्या या गोंधळामुळे रेल्वेचे पुणे विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने गाडीचे दरवाजे उघडून गाडीत जागा मिळवून दिली. तर उर्वरित प्रवाशांना दुसर्या गाडीतून पाठविले.