

न्हावरे; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील न्हावरे ते पुणे स्टेशनदरम्यानची पीएमपीएलची बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील बस सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी न्हावरे परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. वर्षभरापूर्वी धूमधडाक्यात पीएमपीएलने न्हावरे मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली होती. या बस सेवेमुळे न्हावरे, उरळगाव, दहीवडी, माळवाडी, घोलपवाडी परिसरातील प्रवाशांचा पुणे शहराकडे जाण्या- येण्याचा प्रश्न मिटला होता.
बस सेवेमुळे ग्रामस्थांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले. नोकरदार, व्यापारी, प्रवाशी यांचा दळणवळणाचा प्रश्न मिटला होता. बस सेवेमुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. बस बंद करण्यात आल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार व्यावसायिक यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे बस सेवा सुरू करावी, अन्यथा न्हावरे परिसरातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.