

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ७) पत्रकार परिषद घेऊन त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कथित जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांवर सविस्तर आणि परखड स्पष्टीकरण दिले. पुण्यातील कोरेगाव पार्कजवळील कथित 'महार वतन' जमिनीच्या खरेदी-विक्रीवरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भूमिका मांडत या व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.
उपमुख्यमंत्री पवार या प्रकारणी माहिती देतना म्हटले की, ‘या प्रकरणातील जी काही कागदपत्रे तयार झाले होती, ती सर्व रद्द करण्यात आली आहेत. तसेच, महसूल सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेला सर्व स्पष्टीकरण कळले पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली.
‘मी आजपर्यंतच्या माझ्या 35 वर्षांच्या राजकीय जीवनात नियम सोडून काम केले नाही. माझ्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही. तरीही अधूनमधून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. या व्यवहारात मी एक रुपया देखील दिलेला नाही, तरी विरोधकांनी मोठे आकडे सांगून टार्गेट केले. तो त्यांचा अधिकार आहे. पण या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यावर, मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरला असताना त्यांच्याशी फोनवर बोललो आणि तुम्हाला चौकशी करायची असेल तर करा, माझा पाठिंबा आहे,’ असे स्पष्टपणे सांगितल्याचे पवार यांनी यावेळी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन झालेले कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. त्यांनी अधिकारी वर्गाला कडक सूचना देत म्हटले की, ‘मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने माझ्या सर्व अधिकाऱ्यांना सूचित करतो की, भविष्यात नियमांचे उल्लंघन करणारे कोणतेही प्रकरण आल्यास, त्यांनी कुठल्याही राजकीय किंवा अन्य दबावाला बळी न पडता, ते त्वरित रद्द करावे. माझा जवळचा नातेवाईक असला तरीही हे करायचे.