

Parth Pawar Land Raw: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' (Amedia) कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातीतल जमीन बेकायदेशीररित्या खरेदी केल्याची आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी कारवाई झाली असून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त पुढारी न्यूजने दिलं आहे.
या प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर ही करावाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमका शासन आदेश काय?
आदेश
ज्याअर्थी श्री. सुर्यकांत येवले, तहसिलदार, पुणे शहर यांनी उक्त पदावर कार्यरत असतांना मौजे बोपोडी ता. पुणे शहर, जिल्हा पुणे येथील स.नं.६२ चे ७/१२ सदरी "अॅग्रीकल्चर डेरीकडे" असे मालकी हक्कात शासकीय विभागाचे नाव असताना देखील श्री. सुर्यकांत येवले, तहसिलदार पुणे शहर यांनी जाणीवपूर्वक कायदेशीर व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अनाधिकाराने मालकी हक्काबाबत अर्जदारांतर्फे आदेश दिल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर आदेशान्वये शासकीय जमीन खाजगी व्यक्तीस प्रदान केल्याने शासकीय जमीनीचा अपहार झाला आहे. उक्त अनियमितता हि गंभीर स्वरूपाची असून श्री. येवले, तहसिलदार पुणे शहर यांची वर्तणुक बेजबाबदारपणाची व शासकीय अधिकाऱ्याला अशोभनिय अशी आहे. यावरून श्री. येवले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. सबब, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार श्री. येवले यांच्याविरुध्द विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधिनतेने त्यांना शासनसेवेतून निलंबित करणे आवश्यक आहे.
२. त्याअर्थी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन श्री. सुर्यकांत येवले, तहसिलदार, पुणे शहर यांना तात्काळ प्रभावाने पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.
३. शासन असेही आदेश देत आहेत की, प्रस्तुत आदेश अंमलात असेपर्यंत श्री. सुर्यकांत येवले, तहसिलदार, यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये,
४. श्री. सुर्यकांत येवले, तहसिलदार यांना त्यांच्या निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता देण्यासंबंधी खालील आदेश देण्यात येत आहेतः-
१) निलंबनाच्या कालावधीत श्री. सुर्यकांत येवले, तहसिलदार यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा वा व्यापार करू नये. (त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल) व तसे केल्यास ते निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील.
२) निलंबनाच्या कालावधीत त्यांना निलंबन भत्ता जेव्हा देण्यात येईल त्या प्रत्येक वेळी त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारलेली नाही किंवा कोणताही खाजगी धंदा वा व्यापार करीत नाही अशा त-हेचे प्रमाणपत्र श्री. सुर्यकांत येवले, तहसिलदार यांना द्यावे लागेल.
काय आहेत आरोप?
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी, या 40 एकर जमिनीचे बाजारमूल्य सुमारे 1800 कोटी रुपये आहे. ही जमीन 'अमेडिया' कंपनीने केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केली आहे असा आरोप केला होता. त्याचबरोबर अमेडिया कंपनीचे भांडवल हे फक्त १ लाख रूपये असून ते एवढ्या मोठ्या किंमतीची जमीन खरेदी करू शकतात का असा सवाल देखील केला होता.