पारगावला अंतर्गत वाद ठरणार दोन्ही गटांची डोकेदुखी

पारगावला अंतर्गत वाद ठरणार दोन्ही गटांची डोकेदुखी

राजेंद्र खोमणे : 

नानगाव : दौंड तालुक्यातील राजकीय पटलावरील महत्त्वाचे गाव म्हणून पारगाव सा. मा. या गावाची ओळख आहे. गावात जरी समोरासमोर दोन राजकीय गट असले तरी या गटांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अंतर्गत वाद असल्याची चर्चा गावात आहे, त्यामुळे आगामी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही गटांना अंतर्गत वादाचा फटका सहन करावा लागणार आहे.
या गावातील नेत्यांनी तालुका, जिल्हा व राज्यपातळीवरील वेगवेगळ्या पदांवर कामे केली आहेत व सध्या करत आहेत, त्यामुळे या गावाला राजकारणात महत्त्व असल्याने गावात होणार्‍या कोणत्याही निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागलेले असते.

येथे प्रामुख्याने आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात समर्थक असे दोन गट आहेत. येथील निवडणुकीत चांगलीच चुरस पहावयास मिळते. सध्या येथील ग्रामपंचायतीवर आमदार कुल समर्थकांचे वर्चस्व आहे तर माजी आमदार रमेश थोरात यांचा गट विरोधात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जनतेतून सरपंच निवडला गेला, त्या वेळी आमदार राहुल कुल समर्थकांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली.

मागील निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात समर्थक गटाला चांगलाच धक्का बसल होता. अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत कुल समर्थक गटाने चांगलीच बाजी मारली होती. झालेला हा पराभव थोरात समर्थक गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. या पराजयाची परतफेड सोसायटीच्या निवडणुकीत करण्यासाठी तयार झालेल्या पॅनेललादेखील पुन्हा एकदा कुल समर्थकांनी धक्का दिला आणि ग्रामपंचायत व सोसायटी या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी कुल गटाने आपले वर्चस्व प्रस्तापित केले. मागील पाच वर्षांच्या कालखंडात सत्ताधारी कुल समर्थक गटातील काही सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नाराज असल्याची चर्चा सतत होत होती.

यंदाच्या निवडणुकीत ही अडचण ठरणार तसेच याच काळात एका महत्त्वाच्या विषयाकडे गावातील तरुणांनी लक्ष केंद्रित केले होते. मात्र, या विषयामध्ये गावातील काही तरुण सत्ताधारी गटावर नाराज असल्याचा सूर आहे. अनेक वर्षे सत्ताधारी व विरोधी गटाबरोबर असलेले तरुण आता निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. तरुण एकत्रित येऊन निवडणूक झाली तर दोन्ही गटांना हे परवडणारे नाही, असेही बोलले जात आहे.

थोरात समर्थक गटातदेखील सगळंच आलबेल आहे, असे नाही. या गटातदेखील कायम एकमेकांची जिरविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे, त्यामुळे रमेश थोरात गटातील नाराज असलेले कार्यकर्ते व तरुण वर्ग एका बाजूला असून, हा स्वतंत्र वेगळा गट अस्तित्वात आहे. या गटाला जर विश्वासात घेतले नाही तर या गटाचादेखील मोठा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news