पालकांनो, मुलांना पोहायला शिकवा! वाढत्या दुर्घटनांमुळे पोहण्याचे धडे काळाची गरज

पालकांनो, मुलांना पोहायला शिकवा! वाढत्या दुर्घटनांमुळे पोहण्याचे धडे काळाची गरज

[author title="नितीन वाबळे" image="http://"][/author]

मुंढवा : एम्प्रेस गार्डन ते शिंदेवस्ती व पुढे वैदूवाडी परिसरातून वाहणार्‍या नवीन कालव्यात मागील महिनाभरात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. महापालिका आणि पाटबंधारे विभाग तसेच पालकांनीही मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. बुडालेल्या मुलांना पोहता येत असते, तर या दुर्घटना टाळल्या असत्या. यानिमित्ताने पालकांनी मुलांना पोहायला शिकवणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

पूर्वी विहिरीमध्ये मुलांना पोहायला शिकवले जात होते. मात्र, उपनगरांमध्ये वाढत्या सिमेंटच्या जंगलांमुळे विहिरी शिल्लक राहिल्या नाहीत. कालव्यामध्ये पोहणेही धोकादायक आहे. त्यामुळे मुलांना पोहायला कुठे शिकवायचे? असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबातील पालकांपुढे उभा राहत आहे. पूर्वी पालक दरवर्षी शाळा आणि महाविद्यालयांतील मुलांना उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावाकडे पाठवत होते. गावाकडे विहिरींमध्ये मुले पोहायला शिकत होती. मात्र, आता पालक मुलांना गावाकडे पाठवण्याऐवजी शिबिर किंवा पुढच्या वर्गाच्या अभ्यासामध्ये गुंतवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

वास्तविक, शाळा-महाविद्यालयांमध्ये छोटेखानी स्वीमिंग टँक (जलतरण तलाव) उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे मुलांना पोहण्याचे प्राथमिक धडे शाळेतच मिळतील आणि असे अनर्थ टाळण्यास मदत होईल. सहलीला गेल्यानंतर समुद्रकिनार्‍यावर पाण्यामध्ये डुंबताना अनेक मुले बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने शालेय स्तरावरच पोहण्याचे धडे दिले, तर पुढील अनर्थ टाळण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. महापालिकेने शहर आणि परिसरामध्ये प्रत्येक विभागातील शाळेमध्ये जलतरण तलाव उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांनीही प्रशिक्षकामार्फत मुलांना पोहण्याचे धडे देण्याबरोबरच पोहण्यासाठी सुविधाही उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

जलतरण तलावांची संख्या वाढवा

उपनगरा परिसरात जलतरण तलावांची वानवा आहे. उपलब्ध असलेल्या तलावांपैकी अनेक तलाव बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे मुले पोहण्यासाठी कालव्याचा आधार घेत आहेत. कालव्यामध्ये पोहणे धोकादायक असल्याने खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने जलतरण तलावांची संख्या वाढवून ते कमी शुल्कामध्ये मुलांना पोहण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

मुले कालव्यामध्ये धोकादायकरीत्या पोहतात. पालकांनी याविषयी मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पालिकेचा जलतरण तलाव आहे, तिथे पालिकेने शालेय मुलांना कमी शुल्कामध्ये पोहण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक शाळा-महाविद्यालयामध्येही छोट्या जलतरण तलावांची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

– रवी पिल्ले, मुख्याध्यापक, फोरसाईट स्कूल ज्युनिअर कॉलेज, घोरपडी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news