

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील वाँटेड गुन्हेगार पप्पुल्या वाघमारे याच्या टोळीने मंगळवारी रात्रभर शहरात राडा घातला. कर्वेनगर परिसरात मध्यरात्री दहा वाहनांची तोडफोड करीत तिघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सहकारनगर येथील तळजाई वसाहत परिसरात त्यांनी तब्बल 26 वाहनांची तोडफाड करीत दहशत माजवली. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकाने अखेर दुपारी त्यांना पकडले.
याप्रकरणी, वारजे माळवाडी आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पप्पुल्या ऊर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे (वय 19, रा. दत्तनगर, वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव असून, त्याच्या सात ते आठ साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. पप्पुल्या वाघमारे हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. रामनगर परिसरात तो राहात असून, तेथे त्याची मोठी दहशत आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून तो वाँटेड होता.
दरम्यान, वारजे माळवाडी परिसरात परवा सात वाहनांची तोडफोड झाली होती, तसेच तीन दिवसांपूर्वी एका तरुणावर गोळीबार झाला होता. या पार्श्वभूमीवर रामनगर झोपडपट्टी परिसरात मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्यातच पप्पुल्या वाघमारेच्या टोळीने कर्वेनगर परिसरात दहशत माजवली. कोम्बिंग ऑपरेशन करणारी पथके दाखल झाली. मात्र, त्याअगोदरच पप्पुल्या वाघमारेच्या टोळीने दुचाकीवरून पळ काढला. ही टोळी पहाटे सव्वातीनच्या सुमारास तळजाई वसाहत परिसरात दाखल झाली. रस्त्यावर लावलेली तब्बल 26 वाहने कोयत्याने फोडली. काही नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगल, आर्म अॅक्ट आणि दहशत पसरवण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, सहकारनगर पोलीस ठाण्यात दहशत पसरवणे, आर्म अॅक्ट आदी कलमांतर्गत पप्पुल्या वाघमारेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, प्रवीण पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर आणि गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले होते.
जिथे तोडफोड, तिथेच काढली धिंड
दहशत माजवत पप्पुल्याने जेथे वाहनांची तोडफोड केली. त्याच परिसरातून पोलिसांनी त्याची धिंड काढली. या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून रामनगर परिसरात गुन्हेगारी टोळक्यांनी चांगला उच्छाद मांडला आहे.
गुन्हे शाखा आक्रमक
गुन्हेगारी टोळक्यांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. नव्याने गुन्हेगारी वाटेवर चालू पाहणारी ही टोळकी आहेत. उपनगरात हे लोण प्रामुख्याने वाढीस लागत असून, दोन गटांतील वर्चस्ववादाचा हा संघर्ष असल्याचे दिसून येते. रामनगर परिसरात झालेला गोळीबार आणि आताची ही तोडफोड याचेच प्रकार आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकांनी गुन्हेगारांच्या विरुद्ध आक्रमक मोहीम हाती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
पप्पुल्या वाघमारे टोळीवर मोक्का
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यान्वये पप्पुल्या वाघमारे टोळीवर कारवाई करण्यात आली. टोळीप्रमुख पप्पुल्या ऊर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे (19, रा. दत्तनगर, सुभाष बराटे चाळ, रामनगर, वारजे माळवाडी), राहुल विठ्ठल वांजळे (24, रा. आहिरेगाव), मारोती ऊर्फ मारत्या पांडुरंग टोकलवाड (19, वारजे), हर्षद ऊर्फ बाब्या संतोष वांजवडे (19, रा. वारजे गावठाण) यांच्यासह त्यांचा साथीदार नद्या अशा पाच जणांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी मोक्काचा अहवाल तयार केला होता. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. आयुक्तांनी केलेली ही 28 वी कारवाई आहे.