

पानशेत : पुढारी वृत्तसेवा : पानशेत (ता. वेल्हे) येथे चोवीस तास शुद्ध पाणीपुरवठा करणारी वेल्हे तालुक्यातील पहिलीच जलशुद्धीकरण योजना असा गाजावाजा केलेली जलजीवन मिशन योजना कागदावरच आहे. या योजनेचे थेंबभर पाणीसुद्धा पानशेतकरांना मिळाले नाही. एकापाठोपाठ एक तीन योजना पानशेत व परिसरातील रानवडी व कुरण खुर्द येथे राबविण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात या योजनांचे पाणी आलेच नाही. लाखो रुपयांच्या बोगस योजनांबाबत दोन वर्षांपासून वांरवार तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने पानशेत धरणातील पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत असून हजारो रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पानशेत ग्रामपंचायतीने 12 वर्षांपूर्वी आपलं पाणी योजना व त्यानंतर जलजीवन योजना राबविली. या योजनेत पानशेत धरणातील पाणी उचलून जलशुद्धीकरण यंत्रणा व पाण्याची टाकी उभारली. मात्र, तेथून पाणीपुरवठा न करता जुन्या योजनेच्या टाकीमार्फत सडलेल्या जलवाहिनीतून कसाबसा पाणीपुरवठा सुरू आहे. सुमारे 90 लाख रुपये खर्चाची योजना पूर्ण करून 23 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली. प्रत्यक्षात जलजीवन मिशन योजना सुरूच झाली नाही. त्यामुळे आपलं पाणी योजनेच्या जीर्ण जलवाहिनीच्या पाण्यावरच पानशेतकर अवलंबून आहेत.
ग्रामस्थांनी बोगस योजनेबाबत पाठपुरावा केल्यानंतर गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामीण विकास मंत्रालयाने जिल्हा परिषद प्रशासनाला या योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही तक्रारीची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेली नाही. दरम्यान, या बाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
काम पूर्ण नसताना जलजीवन योजनेचे उद्घाटन करण्यात आले. अद्यापही जलवाहिनी बसविण्याचे काम अर्धवट आहे. धरणातील पाणीपातळी खालावली असल्याने आगामी काळात दूषित पाण्यामुळे नागरिकांना आजारांची लागण सुरू होणार आहे.
-सुनील गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पानशेत.
जुन्या मोडकळीस आलेल्या पाणी योजनेतूनच कसाबसा पाणी पुरवठा सुरू आहे. जलजीवन मिशन योजनेचे पाणी कधी मिळणार याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे.
-बाळासाहेब कोंढेकर, माजी उपसरपंच.
हेही वाचा