

वेल्हे: अतिवृष्टीमुळे ७ जुलै रोजी पानशेत-घोल रस्त्यावर घोलखड (ता. राजगड) येथे कोसळली दरड हटविण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यातच दोन दिवसांपासून या परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने दरडी हटविण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
दोन आठवड्यांपासुन रस्ता बंद असल्याने घोल, दापसरे, कुर्तवडी आदी गावांतील शेकडो नागरिकांची वणवण सुरू आहे. पायपीट करत तसेच घोलखड रस्त्यावर मिळेल त्या वाहनाने पानशेत येथे बाजारहाट, दवाखान्यात जावे लागत आहे. दरम्यान, बेकायदा डोंगर तोडणाऱ्या तसेच अतिक्रमणे करणाऱ्या भांडवलदारांना राजगड तहसील कार्यालयाने नोटीस बजावली आहे.
दरड हटविण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी घाट माथ्यासह सह्याद्रीच्या डोंगर रांगात रिमझिम सुरू असल्याने दरड हटविण्यात अडचणी येत आहे. संततधार सुरू झाल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मातीचा ढिगारा हटविण्यात अडथळे येत आहेत.
दरडी पडल्याने पानशेत-घोल रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने दापसरे, घोल, कुर्तवडी आदी गावांतील शेकडो रहिवाशांचा बाह्यजगाशी संपर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश गाडे म्हणाले, ७ जुलैपासून जेसीबी मशिनच्या साह्याने दरडी, मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे.
पावसाचा जोर कमी झाल्यास दोन-तीन दिवसांत वाहतूक सुरू होईल. टेकपोळेचे माजी सरपंच दिनकर बामगुडे म्हणाले, दरड कोसळल्याने टेकपोळे, खाणु भागात जाणारा जवळचा मार्ग बंद झाला आहे. आजारी व्यक्तीस शिरकोली मार्गे दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.