Panshet flood land ownership delay
पुणे: पानशेत पूरग्रस्तांच्या 103 पैकी 12 गृहनिर्माण संस्थांना जागेचा मालकी हक्क मिळाला आहे. मात्र, 64 वर्षे उलटूनही पूरग्रस्तांच्या उर्वरित 94 गृहनिर्माण संस्था जागेचा मालकी हक्क मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरात लवकर या गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क मिळावा, अशी मागणी पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांचे विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात आली आहे.
पानशेत धरणफुटीने पुणे शहरात आलेल्या शनिवारी (दि. 12, जुलै) 64 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या वेळी पुरबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसनाने पूरग्रस्तांच्या 103 गृहनिर्माण निर्माण झाल्या. त्यातील 12 गृहनिर्माण संस्थांना जागेचा मालकी हक्क मिळाला. (Latest Pune News)
मात्र, 91 गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणारे पूरग्रस्त अजूनही भाडे पट्टीवर राहात आहेत. त्यांनाही जागेचा मालकी हक्क मिळावा, अशी मागणी होत आहे. याबाबतच्या मागणीची माहिती पत्राद्वारे पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्था विकास महामंडळाचे सचिव शशिकांत बडदरे यांनी कळवली.
घटनेला 64 वर्षे पूर्ण
पुण्यात पानशेत धरणफुटीच्या घटनेला आज 12 जुलै 2025 रोजी 64 वर्षे पूर्ण होत आहेत. 12 जुलै 1961 रोजी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी घडलेली ही दुर्घटना पुणेकरांसाठी एक काळा दिवस ठरली होती. या घटनेमुळे पुण्यात मोठी हानी झाली.
एक हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर सुमारे एक लाख नागरिक विस्थापित झाले होते. खडकवासला धरणाच्या पश्चिमेला नदीवर 10 ऑक्टोबर 1957 रोजी पानशेत धरणाचे बांधकाम सुरू झाले होते आणि ते 1962 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, नियोजित वेळेपूर्वीच काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली होती.
आंबिल ओढा कॉलनीमध्ये आमच्या कुटुंबासह 120 कुटुंबे पूरग्रस्त आहेत. पूर आला, तेव्हा आम्हाला येथे स्थलांतरित केले होते. भाडेकरारावर आम्ही येथे अजूनही राहत आहे. दरमहिना 12 रुपये भाडे आम्हाला भरावे लागत आहे. पुराच्या घटनेला 64 वर्षे उलटून गेली, तरीसुध्दा अजूनही आम्हाला आमच्या घराच्या जागेचा मालकी हक्क मिळाला नाही. तो लवकरात लवकर मिळावा. संथगतीने सुरू असलेल्या कामाचा वेग वाढवावा.
- श्याम ढावरे, पानशेत धरणफुटी पूरग्रस्त, रहिवासी, आंबिल ओढा कॉलनी
पानशेत पुराची घटना घडली तेव्हा मी 20 वर्षांचा होतो. त्या वेळी मी सकाळी सकाळी कॉलेजला गेलो होतो. त्यामुळे पुरात सापडलो नाही. मात्र, शनिवार पेठेत असलेले आमचे घर आणि संसार पुरामध्ये वाहून गेला. त्या वेळी आम्हाला शाळेतील केंद्रांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 1971 ला आम्हाला राहायला शासनाकडून जागा मिळाली. मात्र, तिचा मालकी हक्क अजूनही मिळालेला नाही. तातडीने आम्हाला जागेचा मालकी हक्क मिळावा.
- अरुण कुलकर्णी, अध्यक्ष, पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्था विकास महामंडळ, पुणे