

पुणे: महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या निरीक्षकांना आता वापरात केलेला बदल, थकबाकी असलेले मिळकतदार, नवीन मिळकतींवरील कर आकारणी करणे अशा विविध स्वरूपाच्या कामांसाठी महिनाभरात किमान शंभर मिळकती तपासण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह कर आकारणी व संकलन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी बाणेर भागात नुकतीच संयुक्त पाहणी केली होती. या संयुक्त पाहणीत काही हॉटेलचालकां कडून पुढील मोकळ्या जागेत शेड, मांडव टाकून व्यवसाय केला जात आहे, इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे, निवासी जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळले होते. (Latest Pune News)
यासंदर्भात बी. पी. यांनी संबधित मिळकतकर निरीक्षकांना संपूर्ण पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. ज्या ठिकाणी मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर होत आहे, त्याची पाहणी करून तेथे वाढीव दराने मिळकतकर आकारणी सुरू करावी, असे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे सातत्याने अतिरिक्त आयुक्त स्तरावर ‘सरप्राईज व्हिजिट’ करून काय कार्यवाही केली, याचा आढावा घेतला जाणार आहे.
भविष्यात मिळकतकर विभागाच्या कामकाजात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. या तंत्रज्ञानामुळे निश्चितच काम करण्यास मदत होईल तसेच मिळकतींच्या नोंदीसंदर्भातील ‘अॅप’मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यातही बदल केले जातील.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका पुणे