

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थानास अवघा एक महिना राहिला आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अनेक ठिकाणी खड्डेमय झाला आहे. पालखी सोहळा मार्गस्थ होण्यापूर्वी मार्ग खड्डेमुक्त होणार का, असा सवाल विचारला जात आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्याचे पुरंदर तालुक्यात 14 जून रोजी आगमन होत आहे. पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात 4 दिवस मुक्कामी असणार आहे.
आळंदी ते पंढरपूर या नवीन पालखी महामार्गाचे काम मागील काही महिन्यांपासून जोरात सुरू केले आहे. अनेक ठिकाणी नदी, ओढ्यावरील पूल बांधणी सुरू आहे. मात्र, जुन्या पालखी महामार्गावरील खड्डे अद्याप बुजवले नाहीत. पंधरा – वीस दिवसांनी मान्सूनला सुरुवात होणार आहे. मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर डांबरी रस्त्यावरील खड्डे कसे बुजविणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
दौंडज खिंड ते निरा (ता.पुरंदर) दरम्यानच्या अत्यंत अरुंद व धोकेदायक रस्त्यावरील काही खड्डे सिमेंटने लाखो रुपये खर्चून मागील
दोन-तीन महिन्यांपूर्वी तकलादू स्वरूपात बुजवले होते. मात्र, निकृष्ट कामामुळे ते खड्डे पुन्हा 'जैसे थे' झाले आहेत. आता तेच खड्डे पुन्हा धोकादायक झाल्याने वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे. अरुंद पालखी महामार्गावरील जेजुरी औद्योगिक क्षेत्र ते निरादरम्यानच्या रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. पालखी मार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असले, तरी ते पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत या पालखीमार्गची साईडपट्टी भरणे, खड्डे बुजवणे गरजेचे आहे.
दौंडज खिंड ते निरा या 20 किलोमीटरच्या रस्त्यावर दौंडज खिंड, जगताप मळा, कदमवस्ती, दौंडज गाव, वागदरवाडी फाटा, वाल्हे बसस्थानक, सुकलवाडी फाटा, कामठवाडी, पिसुर्टी, जेऊर फाटा आदी ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पूर्ण पालखी महामार्गाला साईड पट्ट्याच राहिल्या नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने, वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील ताबा सुटून अपघात होत आहेत.
अपघातात जखमी अनेक दुचाकीस्वार कायमचे जायबंदी तर काही मरणही पावले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याअगोदरच या पालखी महामार्गावर पडलेले खड्डे भरणार आहेत. भाविकांना या पालखी महामार्गावरून विनाअडथळा वारीसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर 'नॅशनल हायवे' च्या वतीने सांगण्यात आले.