

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वाल्हे (ता. पुरंदर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानावर लावण्यात आलेल्या झाडांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने तारले. यंदाच्या उन्हाळ्यात ट्रस्टने दोन टँकर उपलब्ध करून दिल्याने माळरानावरील डौलदार झाडे वाचू शकली. सुकलवाडी फाट्यानजीक असलेल्या ओसाड माळरानावर पालखी सोहळा मागील सहा-सात वर्षांपासून विसावत आहे.
या भव्य पालखी मैदान परिसरात विविध संस्था तसेच हरितवारी उपक्रमांतर्गत आळंदी देवस्थान, सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची देवराई संस्था, बाणेर येथील वसुंधरा अभियान, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे मित्रपरिवार, वाल्हे ग्रामपंचायत, सुकलवाडी ग्रामपंचायत, वृक्षसंवर्धन ग्रुप वाल्हे, विविध राजकीय पक्ष, उद्योजक राहुलदादा यादव युवा मंच आदींच्या वतीने जवळपास 450 विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यात वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, नादुरकी, जांभूळ, करंज, आपटा, गुलमोहर आदी झाडांचा समावेश आहे.
दरम्यान, मागील तीन वर्षांपासून झाडांना पाणी देण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. यावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या माध्यमातून तसेच वाल्हे व सुकलवाडी ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दर गुरुवारी दोन टँकरच्या माध्यमातून या झाडांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली.
ट्रस्टकडून पाण्यासाठी दोन टँकर मागील तीन वर्षांपासून दिले जात आहेत. अमोल दुर्गाडे, योगेश दुर्गाडे, पवन दुर्गाडे, महेश भुजबळ, सागर दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, सनी दुर्गाडे, मयूर भुजबळ, मयूरेश दुर्गाडे, चिन्मय दुर्गाडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गंगावणे, मोतीराम भोसले तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे टँकरचालक सुरेश पवार, प्रवीण शिंदे आदी पालखी मैदानामधील झाडांना पाणी देतात. यामुळे येथील झाडे चांगल्या प्रकारे वाढली आहेत.
मागील अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात ओसाड दिसत असलेल्या माळावर कडक उन्हाळ्यातही हिरवीगार झाडे डौलत आहेत. पालखी मैदानावर कायमस्वरूपी पाण्याची सोय करावी. यामुळे येथील झाडांनाही हे पाणी वापरता येईल, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे, असे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.