खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी : 90 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी

खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी : 90 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी

पुणे : खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 23 गावे, पुरंदर मधील 62 आणि जुन्नर पाच अशा एकूण 90 गावांची पैसेवारी ही 50 पैशांच्या आत आहे. यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळजन्य स्थिती असून, शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान, महसूल विभागाकडून खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी अंतिम केली असून, त्यावरून शेतकर्‍यांचे उत्पादन निश्चित केले जाते. जिल्ह्यातील 1926 गावे असून, त्यातील 543 गावे रब्बीची आहेत. खरिपाची ग्रामीण भागात 996, न. पा. मधील 12 तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 33 गावांचा समावेश आहे. अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, त्यात 1203 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा अधिक आहे. तर 90 गावांची 50 पैशापेक्षा कमी आहे. केंद्र शासनाच्या निकषानुसार पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर हे दोन तालुके पूर्णतः, तर शिरूर, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांत अंशतः दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर राज्य शासनाच्या निकषानुसार इतर सहा तालुक्यांतील 31 महसूल मंडलांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

कशी काढली जाते आणेवारी?
आणेवारी काढण्याची महसूल विभागाची विशिष्ट पद्धत असून, प्रत्येक महसूल मंडलातील एका गावाची निवड केली जाते. या गावातील एका शेतामध्ये 10 बाय 10 मीटर आकाराचे प्लॉट तयार केले जातात. या प्लॉटमधल्या पिकाची कापणी करून त्याचे उत्पन्न काढले जाते. मंडळानिहाय तालुका स्तरावर सर्व डाटा संकलन केले जाते. उत्पादकतेच्या तुलनेत उत्पन्न हे जर 50 टक्केपेक्षा कमी असले तर पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे ग्राह्य धरले जाते.

50 पैशांपेक्षा आणेवारी कमी आल्यास?
पैसेवारी म्हणजेच आणेवारी; यावरच शेतकर्‍यांना मिळणार्‍या मदतीचे गणित अवलंबून असते. पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आली, तर शेतकर्‍यांचा वायदा हा माफ केला जातो, कर्जवसुली थांबवली जाते. म्हणजेच सक्तीची वसुली न करता त्यांना सवलत दिली जाते. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ केले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news