

पुणे : शहराचा पारा बुधवारी 43.6 अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानावर गेला होता. या तापमानाने 128 वर्षांतील कमाल तापमानाच्या विक्रमाला मागे टाकले. 30 एप्रिल 1897 रोजी शहराचे तापमान 43.3 अंशांवर होते. एप्रिलमधील गत 128 वर्षांतील हे सर्वोच्च तापमान होते.शहरात एप्रिल महिन्यात यंदा सातत्याने शिवाजीनगर 40 ते 41, तर लोहगाव सलग पाचव्या दिवशी 43 अंशांवर गेल्याने अभूतपूर्व उकाडा तयार झाला आहे.
सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत शहरात फिरणे अवघड झाले आहे. त्यातच शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते. कात्रज, पद्मावती, तळजाई टेकडी परिसरात बुधवारी दुपारी 3 ते रात्री 7 पर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
विदर्भातील तीन शहरांचे कमाल तापमान 45 अंशांवर गेल्याने त्या भागात हाहाकार निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी 45.6, चंद्रपूर 45.5, तर अकोला शहराचे तापमान बुधवारी 45 अंशांवर गेले होते. तर, पुणे शहरातील लोहगावचे तापमान 43.6 अंशांवर गेल्याने एप्रिलमधील 128 वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद झाली.
राज्यात सर्वत्र अग्निकुंड पेटल्यासारखी स्थिती असून, सरासरी कमाल तापमान 42 ते 45 अंशांवर गेले आहे. सर्वत्र उष्णतेचा वणवा भयंकर पेटल्याने सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत बाहेर पडणे अवघड झाले आहे. अवघ्या विदर्भासह पुणे, सोलापूर, जळगाव, मालेगाव, परभणी, नांदेड, बीड ही शहरे 43 ते 44 अंशांवर गेली आहेत.
मुंबई 33.6, सांताक्रूज 33.7, ब—ह्मपुरी 45.6, चंद्रपूर 45.5, अकोला 45, अमरावती 44.6, नागपूर 44.4, वाशिम 43, यवतमाळ 43.8, जळगाव 43, मालेगाव 43, सोलापूर 43.8, नाशिक 40.2, सांगली 39.3, सातारा 40.7, कोल्हापूर 37.6, अहिल्यानगर 40.9, अलिबाग 35.2, डहाणू 36.3, धाराशिव 42.8, छत्रपती संभाजीनगर 42.2, परभणी 44.1, बीड 43.3.
पुण्यातील बुधवारचे तापमान
लोहगाव 43 (26), शिवाजीनगर 40 (23.9), पाषाण 40 (22.9), चिंचवड 40 (24.4), लवळे 39 (23.6), मगरपट्टा 40 (27.4), एनडीए 39 (22.6), कोरेगाव पार्क 41 (26.9).