

निरा: निरानजीक पाडेगाव (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनीच्या पायाखाली सोमवारी (दि. १९) विषारी साप आला. सुदैवाने सापाने दंश केला नाही. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाडेगाव येथील जि. प. प्राथमिक शाळा सन १९३६ मध्ये स्थापन झाली. या शाळेची अवस्था दयनीय आहे. येथील वर्गात वारंवार साप, विंचू आणि कीटक दिसण्याच्या घटना घडल्या आहेत. पडक्या शौचालय आणि स्वच्छतागृहातही सापांची भीती असते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनाही याच परिसरात मण्यार दिसला होता.
यानंतर आता पुन्हा सोमवारी साप थेट विद्यार्थिनीच्या पायाखाली आला होता. मुख्याध्यापक बापूराव गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत सापाला परिसरातून दूर केले. याबाबत सातारा जि.प.चे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
अनंत अडचणी कायम
पाडेगावच्या जि.प.शाळेची स्थापना होऊन जवळपास नऊ दशके उलटली आहेत. मात्र, आजही शाळेच्या जागेच्या मालकी हक्काचा प्रश्न कायम आहे. यातूनच शाळेच्या इमारतीची पडझड होऊनही दुरुस्तीचा प्रश्न कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगावी, असा संतप्त सवालही ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पाडेगाव शाळेच्या इमारतीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाडेगावची जि. प. प्राथमिक शाळेच्या झालेल्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळाच सुरक्षित नसेल, तर आमची मुले शाळेत पाठवायची कशी? प्रशासनाने शाळेच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे.
प्रियंका खरात, पालक, पाडेगाव