तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : मावळात भात कापणीची कामे उरकत आली असून सध्या कडप, येंगा तयार करून त्याची पावळी बांधण्याची, झोडणीची कामे सध्या मावळात अनेक भागात वेगात चालू आहेत. पावसाने निरोप घेतल्यामुळे रानातील पाणी अटले आहे. यामुळे अशी कामे वेगात कामे सुरु आहेत. तर काही ठिकाणी मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशिनद्वारे भात कापणी केली जाते.
यामुळे पावळीचा भुगा होतो यामुळे शेतक-यांना पावळीपासून उत्पन्न मिळत नसल्यामुळे अर्थिक नुकसान होत आहेच परंतु गुरांना खाण्यासाठी पावळीची कमतरता भासत असुन पुढे गुरांना चारा अपुरा पडण्याची शक्यता आहे. सध्या मावळ भागात सगळीकडेच येंगा तयार करण्याची आणि पावळी बांधणेची कामे आणि झोडणीची कामे सुरु असल्यामुळे मजुरांची कमतरता भासत आहे. यामुळे घरातील माणसे सहकुटुंब येंगा तयार करुन पावळीची आणि झोडणीची कामे करीत आहेत. काही ठिकाणी झोडणी करुन पावळी केली जाते काही ठिकाणी पावळी करुन झोडणी केली जाते.