Rice Crop Damage: जिल्ह्यात अतिवृष्टीने भात रोपवाटिकांचे नुकसान
पुणे: जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट व अतिवृष्टीमुळे जून महिन्यात चार तालुक्यांमध्ये 1275 हेक्टरवरील भात रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये वेल्हा, मुळशी, मावळ व हवेली या तालुक्यांतील 193 गावांतील 3 हजार 321 शेतकर्यांना नुकसानीच्या पंचनाम्यानुसार सुमारे 1 कोटी 8 लाख 43 हजार रुपयांइतकी नुकसानभरपाई मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विभागीय महसूल आयुक्तांकडे पाठविला आहे.
जून 2025 मध्ये 141 टक्के पाऊस पडला. वेल्हा, मुळशी, मावळ व हवेली या तालुक्यांत नवीन लागवड झालेल्या भात रोपवाटिकेचे नुकसान झालेले आहे. शासनाच्या 27 मार्च 2023 च्या निर्णयान्वये जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी 8 हजार 500 रुपये मदतीचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. (Latest Pune News)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून भात रोपवाटिका नुकसानीचा पंचनाम्यानुसारचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला होता. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढे पाठविल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
अतिवृष्टीने पिकांचेही 6.58 लाखांचे नुकसान...
जून महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतपिके, फळपिके, शेतजमीन आदींच्या 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे पंचनामे अंतिम झाले आहेत. शेतपिके, फळपिके व जमिनीचे 15 गावांतील 147 शेतकर्यांचे नुकसान झाले. त्यांचे 40.17 हेक्टरवरील पिकांचे 6 लाख 58 हजार रुपयांइतके नुकसान झालेले आहे.
शासनाच्या 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार नुकसानीस आर्थिक साहाय्याचे दर प्रतिहेक्टरी कमीत कमी कोरडवाहू पिकांसाठी 1 हजार रुपये, बागायती पिकांसाठी 2 हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 2500 रुपये आहे. तहलीसदार कार्यालयानुसार वेल्हा, मुळशी, लोणी काळभोर व दौंड यांचा या नुकसानीत समावेश असल्याचे काचोळे यांनी सांगितले.

