पिंपरी : मैदानाअभावी मुलांच्या खेळण्याचा होतो आहे खेळखोळंबा !

पिंपरी : मैदानाअभावी मुलांच्या खेळण्याचा होतो आहे खेळखोळंबा !

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 105 प्राथमिक विभागांच्या शाळांपैकी 22 शाळांना मैदानच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खेळण्यावर मर्यादा येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. मैदान नसल्याने आता थंडीच्या दिवसात वार्षिक क्रीडा स्पर्धेचा सराव कुठे करायचा, असा प्रश्न पडत आहे.

खेळाडू घडणार कसे? 

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या शाळेत गोरगरीब मुले शिक्षण घेतात. महापलिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्याकडे पालिका प्रशासनाचा कल आहे. त्यासाठी प्रशासनाचे प्रयत्नही सुरू आहेत; मात्र याचवेळी विद्यार्थ्यांच्या कला-क्रीडा गुणांनाही वाव मिळणे अपेक्षित आहे. काही विद्यार्थी हे क्रीडा निपुणदेखील आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेत असतानाच शाळांनी क्रीडा मैदाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे क्रीडा निपुण विद्यार्थ्यांचा सरावही उत्तम होईल. शहरात फक्त खासगी शाळांमध्येच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडत आहेत. महापालिकेनेदेखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी शाळांना मैदाने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांची खेळासाठी कुचंबणा होत आहे. स्मार्ट व डिजिटल शिक्षणावर भर देताना मात्र, क्रीडा विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे ही गंभीर
बाब आहे.

मैदाने झाली पार्किंग झोन

महापालिकेच्या मराठी, उर्दू, प्राथमिक व माध्यमिक शाळा एकाच ठिकाणी आहेत. या दोन ते तीन शाळांना एकच मैदान वापरले जाते. तर काही शाळांची मैदाने छोटी आहेत. यामध्ये शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी हे चारचाकी गाड्या घेऊन येतात. या गाड्या शाळेतील मैदानावरच पार्क केल्या जातात. त्यामुळे मैदानाची बरीचशी जागा व्यापली जाते. सध्या शाळेची मैदाने ही पार्किंग झोन झाली आहेत.

पीटीच्या तासात इनडोअर गेम्स किंवा संगणकाचे वर्ग

शाळेला मैदानच नसल्याने पीटीच्या तासात इनडोअर गेम्स किंवा संगणकाचे वर्ग घेण्यात येतात. गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात मुलांचा ऑनलाईन शिक्षण आणि इनडोअर गेम्सवरच भर होता. आताही ज्या शाळांना मैदाने नाहीत, अशा शाळेतील विद्यार्थ्यांची हीच परिस्थिती आहे.

क्रीडा शिक्षकांना इतर कामे

महापालिका शाळेत असलेल्या क्रीडा शिक्षकांना इतर कामे दिली जातात; तसेच क्रीडा शिक्षक कमी असताना क्रीडा शिक्षक निवृत्तीनंतर रिक्त पद भरले जात नाही. मुळात कला आणि क्रीडा हे सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने क्रीडा विकासाला खीळ बसली आहे.

शाळा मान्यतेसाठीचा निकष

'आरटीई'अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मान्यतेसाठी 11 निकष आहे. त्यात क्रीडांगण व त्याला कुंपण असणे आवश्यक असते. मैदान नसेल तर शाळेला मान्यता देता येत नाही. मैदान तपासणीबाबत शिक्षण विभागाने पडताळणी करणे आवश्यक असते. शाळेच्या मालकीचे मैदान नसेल तर महापालिकेने विकसित केलेल्या क्रीडा मैदानावर घेऊन जाणे आवश्यक असते.
ज्या शाळांना मैदाने नाहीत, त्यांना दुसर्‍या शाळेच्या मैदानात खेळण्यास नेण्याची परवानगी मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. मैदाने नसलेल्या शाळांसाठी लवकरच जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
                                     -संदीप खोत, उपायुक्त, शिक्षण विभाग पिं.चि.मनपा

महापालिकेकडे मैदानासाठी जागा आरक्षित असूनही ताब्यात घेतली जात नाही. ज्या शाळांना मैदाने नाहीत तेथील विद्यार्थ्यांना मनपाच्या क्रीडा मैदानात घेऊन जायला पाहिजे. कोरोनाच्या पूर्वी विद्यार्थ्यांना नेले जायचे; परंतु सध्या पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडा मैदानात नेले जात नाही. जसेच ज्या शिक्षकांची नेमणूक क्रीडा शिक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांना इतर कामे लावू नयेत.
                  -शरद लावंड, अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण परिषद

मैदान नसलेल्या शाळा
1) केशवनगर प्रा. शाळा, 2) रावेत मनपा शाळा, 3) पुनावळे कन्या शाळा 4) माळवाडी मनपा शाळा, 5) दिघी मुले, 6) दिघी मुली, 7) चिखली मनपा मुले, 8) चिखली मनपा शाळा मुली, 9) नागू बारणे शाळा मुले 10) संत तुकारामनगर मुले 11) हुतात्मा चापेकर विद्यामंदिर उर्दू 12) नवनाथ दगडू प्राथमिक शाळा भाटनगर,13) काळेवाडी प्राथमिक शाळा मुले 56 / 1, 14) काळेवाडी प्राथमिक शाळा मुले व मुली 56 / 2, 15) मनपा उर्दू प्राथमिक शाळा काळेवाडी, 16) कस्पटे वस्ती मनपा शाळा, 17) सोनवणे वस्तीशाळा, 18) नेवाळे वस्ती शाळा, 19) मनपा विकासनगर प्राथमिक शाळा, 20) पुनावळे शाळा, 21) कुदळवाडी प्राथमिक शाळा, 22) मनपा धायरकरवाडी शाळा तर इतर 17 शाळांची मैदाने छोटी आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news