पिंपरी : पुृढारी वृत्तसेवा : शहरांमधील रस्त्यांवर चालणे, सायकल चालविण्यासाठी परिवर्तन सुरू केले आहे. तसेच उड्डाण पुलाखालील अडगळीच्या जागा लोकोपयोगी कारणांकरिता विकसित करीत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते व सार्वजनिक ठिकाणे नागरिक केंद्रीत विकसित करण्यासाठी आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे शुक्रवार (दि.12) व शनिवारी (दि.13) दोन दिवस राष्ट्रीय कार्यशाळा होणार आहे या कार्यशाळेत देशातील 100 स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.10) दिली.
शहरी रस्त्यांचे नियोजन, पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांमधील जागरूकता वाढविण्यात पिंपरी-चिंचवड शहर देशपातळीवर अग्रेसर ठरले आहे. देशभरातील तब्बल 117 शहरांमधून रस्त्यांचे स्वरूप बदलण्यासाठी नागरिकांना रस्त्यांचे केंद्रबिंदू बनवून चांगले रस्ते व पदपथ करून पिंपरी चिंचवडने नवी उंची गाठली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरी रस्ते व सार्वजनिक जागांवर राष्ट्रीय कार्यशाळांची मालिका केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केली आहे. त्यात मुख्यत्वे रस्त्याचे डिझाईन अंतिम करून त्याचे प्रात्यक्षिक करणे. नागरिक व वाहनाचालकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते.
या अगोदर श्रीनगर, कोइम्बत्तूर या शहरामध्ये ही कार्यशाळा झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तिसरी कार्यशाळा होत आहे.
कार्यशाळेदरम्यान फ्रीडम टू वॉक सायकल रन या उपक्रमातील विजेत्या शहरांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यशाळेत स्ट्रीट डिझाईनची उजळणी, डेटा व डिझाईनवर चर्चा, डिझाईन सोल्युशन, पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यावरील कायापालटाचा प्रवासाविषयी विविध सादरीकरण, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके व स्थळ पाहणी आदी कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यशाळेत रस्त्यांच्या विविध पैलूंवर आधारित आहे. फ्रीडम टू वॉक सायकल रन मोहिमेच्या माध्यमातून पायी चालणे, सायकल चालणे व धावणे या दैनंदिन सवयी स्वीकारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. शहरामधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा