पिंपरी : राज्यात बोगस पासपोर्ट, पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवून देणार्या संघटित टोळ्या उदयास येऊ लागल्या आहेत. ज्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचे केंद्रीय सुरक्षा एजन्सीच्या निदर्शनास आहे आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस यंत्रणेला 'अलर्ट' देण्यात आला आहे. त्यानुसार, पिंपरी- चिंचवड आयुक्तालयात कागदपत्र पडताळणीसाठी येणार्या अर्जदारांची सखोल चौकशी करण्याचे काम सुरु आहे.
राज्यातील काही भागांमध्ये विदेशी नागरिकांना बेकायदा भारतीय पारपत्र (पासपोर्ट), आधार कार्ड आणि पॅन कार्ड उपलब्ध करून देणार्या संघटित टोळ्या कार्यरत आहेत. ही बाब केंद्रीय सुरक्षा एजन्सीने लक्षात आणून दिली आहे. या रॅकेटमध्ये उत्तर – पूर्व राज्यातील नागरिक आणि त्यांच्या पत्त्यांचा वापर केला जात आहे. या रॅकेटमध्ये असणार्या गुन्हेगारांनी स्थानिक यंत्रणांवर दबाव टाकून पोलिस पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्याचे काही ठिकाणी समोर आले आहे. याशिवाय विदेशी नागरिकांकडून तत्काळ कार्यपद्धतीने पोलिस पडताळणीशिवाय भारतीय पासपोर्टसाठी अर्ज दाखल करण्यात येत आहेत.
या टोळ्यांनी अनधिकृतपणे देशात आलेल्या स्थलांतरितांना तसेच इतर देश विघातक घटकांना बोगस आधार कार्ड तयार करुन दिल्याचा संशय आहे. ज्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचे केन्द्रीय सुरक्षा एजन्सीने संबंधित विभागांना सांगितले आहे. या सर्व बाबी विचारात घेता गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी स्थानिक पोलिसांना दक्षता घेण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार, पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कागदपत्र पडताळणीसाठी आलेल्या अर्जदारांची सखोल चौकशी सुरु केली आहे.
भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार्या अर्जदाराची पडताळणी करताना संबंधितांचा पत्ता, गुन्हेगारी पूर्वइतिहास तसेच ओळखपत्र, वास्तव्य याची योग्यरित्या तपासणी करावी. पूर्णपणे शहानिशा झाल्यानंतर पडताळणी अहवाल पारपत्र कार्यालयात पाठवावा. तसेच, अर्जदारांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट द्यावी जेणेकरुन बेकायदा स्थलांतरीत विदेशी नागरिक तसेच देश विघातक घटकांना भारतीय पासपोर्ट सारखे महत्वाचे कागदपत्र प्राप्त होणार नाहीत. राज्यात सुरु असलेल्या या गैरकृत्यास आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर अशा प्रकारे कडक कारवाई करावी, असे केंदीय गृह विभागाने दिलेल्या आदेशात नमूद आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे तिघांनी मिळून एका महिलेसह शासनाची फसवणूक केली. हा प्रकार निगडी प्राधिकरण येथे उघडकीस आला. सिद्धार्थ विजयेंद्रनाथ कपिल, नर्गिस सिद्धार्थ कपिल, उदित सिद्धार्थ कपिल (सर्व रा. निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी बनावट आरटीओ लायसन्स, आधारकार्ड, पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने बोर्हाडेवाडी, मोशी येथे राहणार्या बांगलादेशी तरुणांना अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले. अटक केलेले तरुण बनावट आधारकार्ड, पॅन कार्डच्या आधारे भारतात वास्तव्य करीत असलयाचे समोर आले आहे. सुकांथा सुधीर बागची (21), नयन बिंदू बागची (22), सम्राट बलाय बाला (22, तिघे मूळ रा. बहादूरपूर, पो. दतोकंदवा, जि. मदारीपूर, बांगलादेश), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एटीएसच्या कारवाईमुळे शहरात अवैधरित्या वास्त्यव्यास असलेल्या कंटकांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार पासपोर्टसाठीचा पडताळणी अहवाल पाठवण्यापूर्वी अर्जदारांची सखोल चौकशी करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या कागदपत्रांची वेगवेगळ्या माध्यमातून पडताळणी करण्यात येत आहे. कागपत्रांमध्ये काही संशयित आढळून आल्यास फाईल फेरपडताळणीसाठी स्थानिक पोलिसांकडे पाठवली जाते. पासपोर्ट विभागात नेमणुकीसाठी असलेल्या पोलिस कर्मचारी आणि अधिकार्यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे.
– नितीन लांडगे, वरिष्ठ निरीक्षक,
पासपोर्ट विभाग, पिंपरी- चिंचवड