

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने मंगळवारी (दि.13) दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यासाठी पाच सदस्यीय शासकीय अधिकार्यांची चौकशी समिती गठित करण्यात आलेली असून, त्यांनी गैरकारभाराची चौकशी करुन एक महिन्यांत स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करावा, असेही म्हटले आहे. सहकार मंत्री अतुल सावे आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे झालेल्या तक्रारींवरुन त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. या विषयांबाबत भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस अॅड. धर्मेन्द्र खांडरे यांनी कात्रज डेअरीमधील भ्रष्टाचाराच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी सहकारमंत्र्यांकडे केली होती.
त्या मागणीवर दुग्धव्यवसाय विकास मंत्र्यांनीही संचालक मंडळाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करुन समितीने एक महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांना 13 डिसेंबर रोजी दिलेले आहेत. कात्रज दूध संघाच्या जिल्ह्यातील दूध शीतकरण केंद्रातील कमी फॅट असलेले म्हैस दूध मुख्यालयात आल्यानंतर जादा फॅट लावण्याबाबतचे प्रकरण मध्यंतरी चव्हाट्यावर आले होते. शिवाय दूध भेसळीचे मशीनच तीन महिने बंद ठेवण्यात आले होते. त्यातून संचालक मंडळामधील मतभेद चव्हाट्यावर आल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संचालकांची तातडीचे बैठक घेत संचालकांना धारेवर धरले होते. तसेच शेतकर्यांची संस्था असल्याने नीट कारभार करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर संचालक मंडळाने काही कर्मचार्यांचे निलंबन करुन काहींच्या बदल्याही केल्या होत्या. या दरम्यान शासनाकडे झालेल्या तक्रारींचे दखल घेत चौकशीच लावण्यात आल्यामुळे दुग्ध वर्तुळात खळबळ उडाली आहे.
श्रीकांत शिपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
नाशिकचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत शिपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती चौकशीसाठी गठित करण्यात आली आहे. सदस्यांमध्ये पुणे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) महेश कदम, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभागाचे पुण्यातील जिल्हा विशेष लेखापरिक्षक अनंत आढारी, दुग्धचे लेखापरिक्षक नितीन देशमुख यांचा समावेश असून पुणे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एस.के. डोईफोडे हे सदस्य सचिव आहेत.