पंतप्रधान मोदींच्या दौर्‍यावेळी विरोधक दाखविणार काळे झेंडे 

पंतप्रधान मोदींच्या दौर्‍यावेळी विरोधक दाखविणार काळे झेंडे 
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यावेळी विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन आणि डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्षसंघटनांचा समावेश असणार आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येणार आहे.
मणिपूर येथील हिंसाचार व महिला अत्याचाराच्या घटनांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच संसदेला सामोरे न जाता विरोधकांचा केला जाणारा अनादर, यासह केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ होणार्‍या सदर आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे व गजानन थरकुटे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, डाव्या चळवळीचे अजित अभ्यंकर, नितीन पवार, सुभाष वारे, डॉ. अभिजित वैद्य, विश्वंभर चौधरी यांसह संबंधित पक्षांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्याच ठिकाणी निषेध सभा घेतली जाणार आहे.
संसदीय लोकशाही परंपरा पायदळी तुडविण्याचे काम पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. तसेच संपूर्ण देश प्रधानमंत्री यांनी संसदेत मणिपूरप्रकरणी निवेदन करावे, याची वाट पाहत असताना ते टाळून प्रधानमंत्री पुण्यात कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याने त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत सर्व विरोधी पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

जशास तसे उत्तर देणार : भाजप

पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अंत्यत महत्त्वाचा आहे. मात्र, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसकडून केवळ वैयक्तिक आकसातून मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन पोलिसांनी थांबवावे; अन्यथा भाजप आंदोलनाचे उत्तर आंदोलनानेच देईल, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला.
मोहोळ म्हणाले की, विरोधकांकडून केली जाणारी ही आंदोलने म्हणजे नौटंकी आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 'लोकमान्य टिळक' पुरस्कार प्रदान सोहळ्यात कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. तरीही या पक्षाकडून आंदोलन केले जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस कुटुंब असलेल्या टिळक घराण्याकडून जो पुरस्कार दिला जात आहे, त्याला काँग्रेसच विरोध करीत आहे. केवळ मोदीद्वेषाने पछाडलेले लोक आंदोलने करू पाहत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौर्‍यावेळी विरोधक जेथे कोठे आंदोलन करणार आहेत, तेथे भाजप कार्यकर्ते आंदोलनानेच त्यांना उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरतील.
पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा अथवा होणारे विविध कार्यक्रम हे काही कुठल्या राजकीय पक्षाने आयोजित केलेले नाहीत. तरीही विरोधकांकडून होणारे मोदी यांच्याविरोधातील आंदोलन म्हणजे पुणेकरांसाठी आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आहे. शहरातील पोलिस यंत्रणेवरील ताण तसेच गेल्या आठ दिवसांत पुणे शहरात घडलेल्या घडामोडी पाहता पोलिस यंत्रणेने विरोधकांकडून होऊ घातलेली आंदोलने होऊ देऊ नयेत, असे आवाहन मोहोळ यांनी केले. या वेळी राजेश पांडे हेदेखील उपस्थित होते.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news