

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना थेट मुख्यमंत्र्यांबरोबर जेवणाची संधी मिळणार आहे. परंतु, त्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मुख्यमंत्र्यांच्या पत्राबरोबर सेल्फी, ऑनलाइन वाचन प्रतिज्ञा, घोषवाक्य तयार करणे आदी दिव्य पार पाडून प्रथम क्रमांक मिळवावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळ' उपक्रमांतर्गत शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला आहे.
राज्यातील 1 लाख 1 हजार शाळांनी आजमितीस सहभाग नोंदविला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेशपत्र सर्व शाळांमधील 2 कोटी 12 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत www. mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषवाक्य अपलोड करायचे आहे. विद्यार्थ्यांचे पालकांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या संदेशपत्रासोबतचा सेल्फी अपलोड करायचा आहे.
या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र विद्यार्थ्यास रोख बक्षीस, त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मुख्यमंत्र्यांबरोबर मुंबई येथे स्नेहभोजन संधी मिळणार आहे. वाचन सवय प्रतिज्ञा मुलांनी घ्यायची आहे. संकेतस्थळावर ऑनलाइन वाचन प्रतिज्ञा घ्यायची आहे. या दोन उपक्रमांपैकी एका उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करायचा आहे. हे तिन्ही उपक्रम संकेतस्थळावर 17 ते 25 फेब्रुवारीदरम्यान अपलोड करायचे आहे. हा उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत.
हेही वाचा