

पुणे: रेल्वे स्टेशनवर प्रवासात अनेकदा घर सोडून आलेली किंवा रस्ता चुकलेली मुले याच गर्दीत हरवून जातात. अशा मुलांसाठी पुणे रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पुणे विभाग प्रशासन खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विभागाने राबविलेल्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत तब्बल 412 मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
रेल्वे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये 355 मुले आणि 57 मुलींचा समावेश आहे. कौटुंबिक वाद, रागाच्या भरात घर सोडणे किंवा पळवून आणलेली ही मुले रेल्वेस्थानक किंवा धावत्या गाड्यांमध्ये संशयास्पदरीत्या आढळली होती. आरपीएफच्या सतर्क जवानांनी या मुलांची वेळीच ओळख पटवून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.
सुटका केलेल्या मुलांची आकडेवारी
मुले - 355
मुली - 57
एकूण मुले - 412