

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी केल्यानंतर तो नेटमीटरींगद्वारे कार्यान्वित करण्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचार्यांनी प्राधान्य द्यावे तसेच आणखी गती वाढवावी, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले. अभियंता व तांत्रिक कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासाठी गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्पाची ग्रीनर्जी सस्टेनेबल्स एलएलपीचे समीर गांधी व एनर्जिका सोल्यूशन्सचे स्वप्निल बाथे यांच्या सहकार्याने उभारणी करण्यात आली. या प्रकल्पाचे उद्घाटक म्हणून मुख्य अभियंता पवार बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत व सतीश राजदीप, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे (मास्मा) संचालक समीर गांधी, राजेश मुथा, रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. 'मास्मा'चे संचालक समीर गांधी म्हणाले की, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत असल्याने सौरऊर्जेचे महत्त्व यापुढे अधिक वाढत आहे. सौरऊर्जा प्रकल्पांबाबत इतर राज्यांच्या तुलनेत महावितरणचे काम चांगले आहे. अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनीही तांत्रिक मार्गदर्शन केले. महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनी सूत्रसंचालन केले.