पुणे; पुढारी वृत्तसेवा : नाकातून दिली जाणारी इन्कोव्हॅक ही कोरोना प्रतिबंधक लस ज्यांचे दोन डोस झाले आहेत, त्यांनाच मिळणार आहे. सध्या ही लस 60 वर्षांवरील नागरिकांना महापालिकेच्या सात दवाखान्यांमध्ये मोफत मिळणार असून, खासगी दवाखान्यात या लसीसाठी 990 रुपये मोजावे लागणार आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कोरोनप्तप्रतिबंधक लशींचा साठा 31 मार्चला संपला होता. तेव्हापासून सर्व केंद्रांवरील लसीकरण बंद होते. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाकातून दिली जाणारी 'इन्कोव्हॅक' लशींची खरेदी करण्यात आली आहे.
ही लस 18 वर्षांवरील ज्यांचे दोन डोस झालेले आहेत, अशांना देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेने राज्याच्या आरोग्य विभागाकडे 5 हजार लशींची मागणी केली होती. मात्र, महापालिकेला 'इन्कोव्हॅक' लशींचे 512 डोस देण्यात आले आहेत. कमी लस उपलब्ध झाल्याने महापालिकेने सध्या केवळ 60 वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
ही लस महापालिकेच्या बोपोडी येथील, कै. द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना, शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालय, मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, कोथरूडचे कै. जयाबाई सुतार रुग्णालय आणि हडपसरचा कै. अण्णासाहेब मगर दवाखाना येथे मोफत उपलब्ध आहे. हीच लस खासगी रुग्णालयात घेण्यासाठी नागरिकांना 990 रुपये मोजावे लागणार आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जात आहे, त्यामुळे ज्यांनी यापूर्वी बुस्टर डोस घेतला आहे, त्यांना घेता येणार नसल्याचे आरोग्य अधिकार्यांनी सांगितले आहे.