पुण्यात फक्त एकच फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट

पुण्यात फक्त एकच फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाकडून 70 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविणे हे कायदेशीररीत्या बंधनकारक करण्यात आले असले, तरी त्याविषयी पुरेशी जागरूकता झाल्याचे दिसत नाही. मुंबईत अशा पद्धतीची 70 हून अधिक लिफ्ट्स बसविण्यात आली असली, तरी पुण्यासारख्या शहरात असे एकच लिफ्ट बसविले गेल्याचे आढळले आहे.

बचाव कार्यात महत्त्वपूर्ण ठरणार्‍या या अत्याधुनिक फायर इव्हॅक्युएशन लिफ्टसंदर्भात तज्ज्ञांच्या चर्चासत्रात हे चित्र पुढे आले. यात स्पार्टन फायर इव्हॅक्युएशन लिफ्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रम मेहता, अग्नीसुरक्षा आणि बचावकार्य तज्ज्ञ डॉ. दीपक मोंगा, तांत्रिक विक्री तज्ज्ञ नितीन पाटील आदी सहभागी झाले होते.

आगीच्या अपघातांदरम्यान अतिउंच इमारतीतील रहिवाशांना वाचवणे ही सर्वांत मोठी चिंतेची बाब असते, अशा इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट हा एक प्रतिबंधात्मक उपाय जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळू शकतो. देशातील सात प्रमुख शहरांपैकी पुण्याने घरांच्या विक्रीत तिमाही-दर-तिमाही सर्वाधिक 13 टक्के वाढ नोंदवली आहे. 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत 14, 100 निवासी युनिट्स विकली गेली असून, पहिल्या सात शहरांमध्ये एकूण घरांच्या विक्रीत पुण्याचा वाटा 16 टक्के होता.

घरांच्या विक्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना पुण्यातील सर्वच उंच इमारती आगीपासून सुरक्षित आहेत का, आग लागण्याची घटना घडल्यास तिथे लोकांच्या सुटकेसाठी योग्य यंत्रणा, व्यवस्था आहे का, असे प्रश्न आता गांभीर्याने पुढे येत आहेत, याकडे मोंगा यांनी लक्ष वेधले. फायर इव्हॅक्युएशन लिफ्टमध्ये असेलेली इंटरनेट ऑफ थिंग्ज प्रणाली आगीच्या अपघातांदरम्यान इमारतीतील अग्निसुरक्षा प्रणाली, सुरक्षा तुकडी, लिफ्ट ऑपरेटर आणि जवळच्या अग्निशमन दल कार्यालयाला सतत संदेश पाठवून माहिती देते.

यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना कमीतकमी वेळेत व सुरक्षितपणे आग लागलेल्या मजल्यापर्यंत पोहोचण्यास मदत करते. महाराष्ट्र ऊर्जा विभागाच्या परिपत्रकानुसार आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवल्यास उंच इमारतींमधील रहिवासी खरोखरच सुरक्षित राहू शकतात.

फायर इव्हॅक्युएशन लिफ्टची रचना फायर लिफ्ट मानकांनुसार केली गेली आहे. याची केबिन ज्वलनशील नसलेल्या सामग्रीपासून बनलेली आहे आणि याचे पॅनेल सिरॅमिक लोकरीने भरलेले आहेत. जे दोन तासांपर्यंत आगीपासून संरक्षण करू शकतात, असेही डॉ. विक्रम मेहता यांनी सांगितले.

अडकलेल्यांना 60 सेकंदांत बाहेर काढू शकते…
दिवाळीतच पुणे अग्निशमन दलाने 17 आगीच्या अपघातांची नोंद केली आहे. याबाबत प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे फायर इव्हॅक्युएशन मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. विक्रम मेहता म्हणाले, " आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांसाठी वरच्या मजल्यावर जलद आणि सुरक्षितपणे पोहोचणे महत्त्वाचे असते. जेणेकरून ते तिथे अडकलेल्या लोकांना वेळेत बाहेर काढू शकतात तसेच आग नियंत्रणात आणून अनेकांचे जीव आणि स्वप्नातले घर दोन्ही वाचवू शकतात. यासाठी ही फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये वापरलेले प्रगत तंत्रज्ञान 60 सेकंदांत एखाद्या व्यक्तीला बाहेर काढू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news