पुणे : मुठभरांकडेच थकबाकींचा डोंगर! 3330 कोटी वसूल करण्याचे आव्हान

पुणे : मुठभरांकडेच थकबाकींचा डोंगर! 3330 कोटी वसूल करण्याचे आव्हान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मिळकतकर विभागाची 1 कोटीपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 1065 थकबाकीदारांकडे तब्बल 3 हजार 330 कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्याची मागणी पुणेकरांकडून केली आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून थकबाकी वसूल होण्यासाठी अभय योजना, करात सवलत, जनजागृती अशा विविध मार्गांचा अवलंब केला जातो. तसेच, थकबाकी वसुलीसाठी बॅन्ड वाजविणे, मिळकत सील करणे, अशी कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही कोट्यवधीची थकबाकी अनेक वर्षांपासून वसूल होत नाही.

या पार्श्वभूमीवर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मिळकत कराची 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती अधिकारात माहिती मागितली होती. यामध्ये 1 हजार 65 जणांकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असून, थकबाकीची रक्कम 3 हजार 330 कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये 71 केस विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत.

ज्यामध्ये अडकलेली रक्कम 737 कोटी रुपये आहे. यातील दोन केसमध्ये 432 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच, मोबाईल टॉवरच्या 660 केसेस असून, त्यात 1 हजार 419 कोटी रुपये अडकले आहेत. दुबार कर आकारणीच्या 105 केस असून, त्याची रक्कम 352 कोटी रुपये आहे. या यादीत 108 केसेस वादात असून, त्यात 344 कोटी रुपये अडकले आहेत. अन्य 121 केसमध्ये 469 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

शासकीय संस्थांकडेही कोट्यवधींची थकबाकी
मिळकतकराची थकबाकी असलेल्यांमध्ये शासकीय संस्था आणि विभागही असून, संरक्षण खात्याकडे 59 कोटी, महावितरणकडे 29 कोटी, जलसंपदा विभागाची थकबाकी 68.49 कोटी ऐवढी आहे. जलसंपदाकडे असलेल्या थकबाकीची वसुली जलसंपदा विभागाला देत असलेल्या पाणीपट्टीमधून वसूल करणे आवश्यक आहे.

कमी थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा महापालिकेने बड्या थकबाकीदारांकडील थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकीकडे नियमित कर भरणार्‍या लाखो नागरिकांना वर्षानुवर्षे मिळणारी 40 टक्के सवलत काढून घ्यायची आणि दुसरीकडे डोंगराएवढी थकबाकी असणार्‍या मूठभर मालमत्ताधारकांकडील थकबाकीच्या वसुलीसाठी नगण्य प्रयत्न करायचे, हे अक्षम्य आहे.
                                                                           – विवेक वेलणकर,
                                                                      अध्यक्ष, सजग नागरिक मंच

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news