

राहुल हातोले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी डेपोमधून बुधवार, दि. 26 रोजी असणार्या भाऊबीज आणि पाडव्याच्या दिवशी पीएमपीच्या 70 टक्केच गाड्या रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्वत:च्या अथवा खासगी वाहनांनी प्रवास करावा लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचा अंदाज आहे.
बसमार्गावर न धावण्यामागचे कोणतेही ठोस कारण पीएमपी प्रशासनाने दिले नाही. मात्र, पाडवा आणि भाऊबीज एकत्र आल्याने प्रवाशांचा पीएमपीला कमी प्रतिसाद मिळेल, असे गृहीत धरून हे नियोजन करण्यात आले असल्याचे समजते. दिवाळीच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुट्या आणि एमआयडीसीतील कंपन्या बंद असल्याने पीएमपीने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या कमी असते. त्यात भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांची संख्या वाढून पीएमपीला अधिकचे उत्पन्न मिळत असते. मात्र, यंदा पाडवा आणि भाऊबीज एकत्र येत असल्यामुळे प्रवाशी घराबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती डेपोमधील अधिकार्यांनी दिली आहे.
मागील दोन दिवसांपासून पीएमपी बसला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुट्या, सरकारी कार्यालय बंद आणि एमआयडीसील कपन्या बंद असल्याने प्रवाशांची संख्या घटल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, प्रवाशी घटल्याने पीएमपीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. बसमध्ये अवघे 10 ते 15 प्रवासी असल्याचे एका बसवाहकाने सांगितले.
भाऊबीजेसाठी बाहेरगावाहून येणार्यांना पीएमपी बसची संख्या कमी असल्याने त्यांची गैरसोय होणार असल्याचे दिसून येत आहे. बसची संख्या कमी असल्याने बस उशिरा धावण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले नागरिक खासगी वाहनाने प्रवास करण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या कालावधीत डेपोमधील तब्बल 60 कर्मचारी सुटीवर गेले आहेत. काही कर्मचार्यांनी तर मेडिकल रजा टाकल्या आहेत. त्यामुळे साप्ताहिक सुटी असणार्या कर्मचार्यांना कामावर बोलवले जात आहे. सध्या उपस्थित असलेल्या कर्मचार्यांमध्ये नियोजन करून बस मार्गस्थ कराव्या लागत आहेत.
निगडी आगारातील पीएमपीच्या सर्व बस (100 टक्के) आज मार्गावर धावणार आहेत. मात्र, बुधवारी पीएमपीच्या 30 टक्के बस आगारातच उभ्या असतील. त्यानुसार, नियोजन करण्यात आले आहे.
– सुनील मोरे, ड्युटी इंचार्ज, निगडी डेपो.